ठाणे : अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही उबाठा पक्षातील अंतर्गत वैमनस्यातून झाली असल्याचा आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
घोसाळकर यांची हत्या ही दुर्दैवी घटना असली तरी यासाठी विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करत असतील तर याचा आम्ही निषेध करत असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. तर राज्यातील परवानाधारक शास्त्रांचा आढावा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीच्या घटनांवरुन मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री फडणवीस आणि सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मॉरिस नोरान्हो हा कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाशीच संबंध होता, हे सामंत यांनी सविस्तरपणे सांगितले.
राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरणे चूक आहे. आरोप-प्रत्यारोप होतात हे मी समजू शकतो, त्यातून होणारी टीका देखील मी समजू शकतो. पण आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारायचे आणि त्यांना बदनाम करायचे ही जी विरोधकांची प्रवृत्ती आहे त्याला छेद देण्याची आज गरज आहे. मी कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कुणाला आदर्श मानतो आणि मी कुणाला आदर्श मानून भविष्यात काम करणार आहे अशी ट्विट्स देखील मॉरिसने सोशल मिडीयावर टाकलेली आहेत. म्हणून अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विनाकारण लक्ष्य करण्याऐवजी मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण, याचा शोध घेतला पाहिजे. या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? घोसाळकर आणि नोरान्हो यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. या दोघांनी उबाठामध्ये एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कुणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही उदय सामंत यांनी केली.