सेंट्रल पार्कचे नामकरण झाले नमो द ग्रँड सेंट्रल पार्क !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे : टीडीआर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तब्बल २० एकरमध्ये बांधण्यात आलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कचे नमो द ग्रँड सेंट्रल पार्क असे नामकरण करण्यात यावे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ही मागणी केली होती.

कोलशेत या ठिकाणी टीडीआर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून २० एकरमध्ये हे ग्रँड सेंट्रल पार्क बांधण्यात आले आहे. या पार्कचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील लोकांना पार्कचे महत्व पटवून सांगितले. शहरात आज ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याची गरज असून हे पार्क ऑक्सिजन देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल न बिघडवता सरकारच्या वतीने सर्व प्रकल्प राबवले जात आहेत. २२ किमीचा शिवडी नाव्हा शिवा प्रकल्प हे उदाहरण असून या प्रकल्पात फ्लेमिंगो पळून जातील असे काही जण म्हणाले होते. मात्र अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प करण्यात आला असून यामध्ये फ्लेमिंगो दुप्पट झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ठाण्यात एवढे मोठे सेंट्रल पार्क उभे राहिले आहे कि इकडच्या लोकांना बाहेर जाण्याची गरज नाही. राज्यातील सर्वात मोठे सेंट्रल पार्क हे ठाण्यात झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सेंट्रल पार्कच्या माध्यमातून ठाणेकरांना फार मोठी पर्वणी मिळाली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या सेंट्रल पार्कला नमो सेंट्रल पार्क असे नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

ठाण्यात बांबूची लागवड करा अशी सूचना करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू कधी कधी कुठे कुठे लागतात, असे विधान केल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. मात्र त्यानंतर माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका असे सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विषयांतर केले.

स्नो पार्कची पुन्हा घोषणा

ठाण्यात स्नो पार्कची काही वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प अद्याप कागदावरच असून त्याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ठाण्यात स्नो पार्क उभारण्यात यावे अशी सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली.