ठाणेकर रेवांत शृंगारपुरे पुन्हा ठरला अजिंक्यवीर

सब ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय खुल्या सब ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून सुमारे 600 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धा ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या. एकूण 14 विविध गटांमध्ये आणि 9, 11, 13 आणि 15 वर्षांखालील वयोगटांमध्ये या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या.

नऊ वर्षाखालील मुलांमध्ये तोयेश दास याला हरवून झियान घिया विजेता ठरला. तर मुलींमध्ये कीयारा साखरे हिने राजलक्ष्मी ठेऊरकर हिला हरवून विजेतेपद पटकावले. ११ वर्षा खालील मुलांमध्ये रुद्र मनोहर ह्याने अंतिम सामन्यात अजिंक्य देसाई याला हरवून सुवर्णपदक पटकावले. मुलींमध्ये प्रिया आंबुरले हिने मायरा गोराडिया हिला हरवून बाजी मारली. तर ११ वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात अद्वैत आणि रुद्र या जोडीला हरवून अर्हम भंडारी आणि रोनित जाधव हे अजिंक्यवीर ठरले.

१३ वर्षांखालील मुलांमध्ये जेडेन मॅथ्यु याला हरवून प्रग्नय शिंदेने अजिंक्यपद पटकावले. तर मुलींमध्ये विधी सैनीने टियान कॅस्ट्रोला हरवून बाजी मारली. दुहेरीच्या गटात ठाणेकर बॅडमिंटनपटू रेवांत शृंगारपुरे आणि हिमांशू भाटकर या जोडीने अतिशय अटीतटीच्या दीर्घकाळ चाललेल्या लढतीत जेडेन मॅथ्यु आणि रुद्र मनोहर यांना २१-१६,१३-२१,२१-१३ असे नमवून अजिंक्यपद पटकावले. मुलींमध्ये आयुशी मुंडे आणि ऋतिका कांबळे यांनी बाजी मारली. १५ वर्षाखालील मुलांमध्ये कृत्य पटेल याने अन्वित नेणे याला हरवून विजेतेपद पटकावले. तर मुलींमध्ये अनुष्का एपटे हिने बाजी मारली. दुहेरीच्या गटात बेनेट बिजू आणि राफेल मस्कॅरहनस यांना हरवून कपिल जगदाळे आणि राघवेंद्र यादव हे अजिंक्यवीर ठरले. मिश्र दुहेरीत चिन्मय फणसे आणि आयुषी काळे यांनी उत्तम खेळाचे सादरीकरण करून सुवर्णपदक पटकावले.

पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या रेवांतच्या दमदार खेळाचे कौतुक करीत त्यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष श्रीकांत वाड तसेच सचिव मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर आणि संदीप कांबळे यांच्या सोबतच सर्व टीमचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.