जि. प. केंद्रशाळेची बोलणारी परसबाग जिल्ह्यात ठरली अव्वल

ठाणे : कान्होर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या परसबागेतील प्रत्येक झाडाला शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी क्यूआर कोड दिला आहे. तो क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, प्रत्येक झाड स्वतः बोलू लागते. आपली विशेषता सांगू लागते. या उपक्रमास राज्य शासनाकडून आयोजित स्पर्धेत जिल्हास्तरावरील शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाले असून राज्यस्तरावर देखील निवड झाली आहे.

शाळेतील विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका कमल फसले, शिक्षक तसेच शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ज्योती राऊत, मदतनीस तारा भोपी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश राऊत, उपाध्यक्षा अपेक्षा झुंजारराव आणि सर्व समिती सदस्य यांच्या सहकार्याने बोलकी परसबाग शाळेच्या आवारात साकारण्यात आली आहे.

झाडावरील कोड स्कॅन केल्यानंतर झाडाचे नाव, उपयोग, गुणधर्म, पोषणमूल्ये इत्यादी माहिती स्कॅनरच्या माध्यमातून मिळते. या परसबागेत पळस, आंबा, चिकू, पेरु, कडुलिंब तसेच अळूची पाने, काकडी, भोपळा, दोडकी, कारली, डोंगर, चवळी, कढीपत्ता, तोंडली, अडुळसा, तुळस, कोरफड, पानफुटी अशी नानाविध वनस्पती लावण्यात आल्या आहेत. दैनंदिन शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यास शिक्षण प्रभावी बनते व विद्यार्थीही आवडीने सहभागी होतात. लाइफ बियाँड स्कुलिंग अर्थात जीवनाभिमुख शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.

या परसबागेत सेंद्रिय खतांचाच वापर केलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून मिळत आहे. मुलांना फळभाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती यांची ओळख होऊन त्यांचे गुणधर्म, पोषणमूल्य यांची देखील माहिती मिळत आहे, असे शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी सांगितले.