नवी मुंबईच्या खाडीकिनारी पसरली फ्लेमिंगोंची गुलाबी चादर

नवी मुंबई: नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसांपासून आलेल्या परदेशी फ्लेमिंगो पक्षामुळे गुलाबी चादर पाण्यावर तरंगताना दिसू लागली आहे.

ऐरोली ते पनवेलपर्यंत पसरलेल्या या खाडीमधील फ्लेमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमीही गर्दी करू लागले आहेत. या फ्लेमिंगोंचा मे महिन्याच्या अखेरपर्यंत खाडीकिनारी मुक्काम राहणार आहे. गुजरात कच्छमध्ये फ्लेमिंगो पक्षांना यंदा पोषक वातावरण भेटल्याने नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोंचे आगमन उशिराने झाले आहे.

ठाणे-नवी मुंबई-पनवेल अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या खाडीकिनाऱ्यावरील वातावरण फ्लोमिंगो पक्षासाठी पोषक असल्याने थंडीत मोठ्या संख्येने फ्लेमिंगोंचे दर्शन होऊ लागले आहे. नवी मुंबई शहराच्या पश्चिमेला असलेल्या खाडीत फ्लेमिंगोची गुलाबी चादर पसरली असल्याने लहान-थोरांची पावले तिकडे वळू लागली आहेत.
जगात सहा जातीचे फ्लेमिंगो असले तरी नवी मुंबईच्या खाडीमध्ये सध्या लेसर आणि ग्रेटर असे दोन जातीचे फ्लेमिंगो पाहायला मिळत आहेत. लेसर जातीचे फ्लेमिंगो गुजरातमधील कच्छ येथून येतात तर ग्रेटर जातीचे फ्लेमिॅगो सायबेरिया आणि कझाकिस्तानमधून हजारो किलो मीटर प्रवास करून नवी मुंबईतील खाडीकिनारी स्थलांतरीत होत असतात. परदेशात या काळात थंडीचा मोसम, बर्फवृष्टी होत असल्याने त्यांची भारताला पसंती असते. नवी मुंबईच्या खाडीकिनारी २०६ विविध जातीचे पक्षी वास्तव्यास असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरू लागली आहे. फ्लेमिंगोंची खाद्यपसंती असलेले शेवाळ, लहान मासे, खेकडे, झिंगा आदी नवी मुंबईच्या खाडीकिनारी मुबलक मिळत असल्याने फ्लेमिंगोंचा या भागाकडे जास्त कल आहे. यासाठीच वनविभागाने ठाणे, नवी मुंबई खाडी किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य घोषित केले आहे.

नवी मुंबईत साधारण नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या पक्षांचे आगमन होत असते. मात्र यंदा गुजरात राज्यातील कच्छमध्ये फ्लेमिंगो पक्षांना यंदा पोषण वातावरण मिळाले होते. त्यामुळे तेथील मुक्काम वाढल्याने नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोंचे आगमन उशिराने झाले आहे. या पाहुण्यांचा नवी मुंबईतील मुक्काम आता मे अखेरपर्यंत असणार आहे. त्यामुळे जसजसे या फ्लेमिंगोंची वाढ होत जाईल तसतसे त्यांच्या रंगात बदल होऊन ते गडद गुलाबी होत जातील, अशी माहिती पक्षीप्रेमी आणि अभ्यासक सुनील अग्रवाल यांनी दिली आहे.