रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच झापले
ठाणे: मागील काही वर्षांपासून रखडलेल्या ठाणे विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम कासवगतीने सुरु असल्याने रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. यामुळे स्थानकाच्या कामाला गती येणार असल्याचा विश्वास ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड दरम्यान असलेल्या मनोरुग्णालयाच्या भूखंडावर विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांनी तसा प्रस्ताव सादर केला होता. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हा प्रस्ताव मंजूर देखिल झाला होता. त्यासाठी १८० कोटींची तरतूद करण्यात आली होती, परंतु आरोग्य विभागाच्या ताब्यात असलेला भूखंड ठाणे महापालिका तसेच रेल्वेकडे हस्तांतरित करण्याच्या वादामुळे मागील पाच वर्षे हा प्रस्ताव रखडला होता. आता जमिन हस्तांतरित झाली असली तरी रेल्वे प्रशासनाच्या कासवगती कारभारामुळे या स्थानकाचे काम पुढे सरकत नसल्याची बाब परवा ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्य महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या स्थानकाचे काम युद्ध पातळीवर करावे, ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील करार लवकर करावा तसेच रेल्वे स्थानकाच्या कामाची निविदा काढून कामे सुरु करावीत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
रेल्वेच्या महा व्यवस्थापकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हे काम लवकर मार्गी लागेल. पुढील आठवड्यात त्याचा करार होईल ,असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ठाणेवैभवला सांगितले.
स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु असून रेल्वे स्थानक झाले कि त्याचा वापर करणे शक्य होणार असल्याचे तो अधिकारी म्हणाला.