आयआरसीच्या नॉर्मनुसार मास्टिक पद्धतीने होणार बांधणी
ठाणे : आयआरसीच्या नॉर्मनुसार नसलेले आणि वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरलेले ठाणे शहरातील १०० पेक्षा अधिक गतिरोधक ठाणे महापालिकेने काढले आहेत. नव्याने बांधण्यात येणारे सर्व गतिरोधक हे आयआरसीच्या नॉर्मनुसार तसेच गतिरोधकांच्या वर मास्टिकचे आवरण देऊन बांधण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
गतिरोधकाबाबत आयआरसीच्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कार्यकारी अभियत्याने आपापल्या विभागात मोहीम घेऊन जे गतिरोधक आयआरसीच्या नॉर्मनुसार नाहीत त्याची यादी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. त्याचसोबत रबराचे गतिरोधक असतील ते काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. ज्या ठिकाणी तात्पुरते गतिरोधक बसवायचे असतील तर ते देखील आयआरसीच्या नॉर्मनुसार बसवावेत, तसेच शहरातील सर्व गतिरोधक आयआरसीच्या नॉर्मनुसार असतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी आयआरसीच्या नॉर्मनुसार नसलेले आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले गतिरोधक काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आली होती. सध्या १०० पेक्षा अधिक गतिरोधक काढून टाकण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी दिली आहे. आयआरसीच्या नॉर्मनुसार शास्त्रशोक्त पद्धतीने गतिरोधकही बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी बांधण्यात आलेल्या गतिरोधकांवर डांबराचे आवरण असल्याने हे गतिरोधक लवकर खराब होत होते. मात्र आता नव्याने बांधण्यात येणाऱ्या गतिरोधकांवर मास्टिकचे आवरण लावण्यात येणार आहे. त्यामुळे याचा दर्जा देखील चांगला राहणार आहे.
वाहनचालकांसाठी जे गतिरोधक त्रासदायक ठरत आहेत ते गतिरोधक शोधून ते देखील काढण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरात जे गतिरोधक बांधण्यात आले होते ते सर्व गतिरोधक हे आयआरसीच्या नॉर्मनुसार बांधण्यात आलेले नव्हते. याशिवाय काही गतिरोधक कमी उंचीचे तर काही गतिरोधक हे जास्त उंचीचे बांधण्यात आले होते. त्यामुळे कमी उंचीच्या गाड्या तर अक्षरशः या गतिरोधकांना घासून जात होत्या. परिणामी अनेक गतिरोधकांची दुरावस्था झाली होती. विशेष करून दुचाकीस्वारांसाठी हे सर्वच गतिरोधक घातक होते. यावर बाईक नेताना अनेक बाईकस्वारांचा तोल जाऊन अपघाताचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले गतिरोधक हटवण्याची मागणी अनेक वाहनचालकांकडून करण्यात आली होती.
*अपघातांसाठी कारणीभूत ठरलेल्या रस्त्यांमधील जॉईंट भरण्याची कारवाई देखील या दीड महिन्यात पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या दीड महिन्यात तब्बल दोन लाख रनिंग मीटर जॉईंट भरले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. रस्त्यामध्ये गॅप पडल्यास अनेकवेळा अपघात होत होते. त्यामुळे हे काम युद्धपातळीवर करण्यात आले आहे. शहरातील एल.बी.एस रोड, कापूरबावडी रोड, बेलापूर रोड, राम मारुती रोड, वागळे मुख्य रस्ता, पोखरण १,२ आणि ३ अरुणकुमार वैद्य मार्ग, स्टेशन रोड या मुख्य रस्त्यांबरोबर अनेक छोट्या-मोठ्या रस्त्यांचे जॉईंट देखील भरण्यात आले आहेत.