सुट्ट्या आपल्याला रिफ्रेश करतात, आपल्याला रिचार्ज करायला मदत करतात आज आपले टीव्ही मालिकांमधले कलाकार ही त्यांच्या हिवाळ्यातल्या सुट्टीच्या आठवणी ताज्या करतायत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ची अक्षरा म्हणजे शिवानी रांगोळे, ” मला हिवाळ्यात लेह-लदाख आणि राजस्थान खूप आवडत. बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे, मनमोहक दऱ्या, उंच पर्वतरांगा, हिवाळ्यात पाहायला एक वेगळाच आनंद मिळतो. मन एकदम रिफ्रेश होऊन जातं. आपल्या भारतात इतकं नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आदरातिथ्य आहे हे प्रत्येकाने आवर्जून अनुभवलं पाहिजे मला वाटतं. हिवाळ्यात फिरताना नेहमी त्वचेची आणि कपडयांची काळजी घ्या. थंड ठिकाणी मी नेहमी ओव्हरसाइझ कोट्स आणि हुडीज वापरते, माझ्याकडे विराजसच्या आणि माझ्या आज्जीने दिलेले लोकरीचे मोजे आहेत ते मी वापरते. त्यासोबत असे मॉइश्चुरायजर जे दुधात बनले आहेत ते लावते ज्यांनी माझी त्वचा कोरडी पडत नाही.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधली श्वेता मेहेंदळे, “माझा जन्म मुंबईचा असल्यामुळे माझ्याकडे काहीकाळ स्वेटरच नव्हते. गेल्यावर्षी जेव्हा कोकण राइड केली तेव्हा कळलं की पहाटे कोकणात बाइक राइडमध्ये थंडी लागते. पण मग जेव्हा मी गोव्याची राइड केली तेव्हा पहिल्यांदा थर्मल, हात मोजे घेतले. मला मुळात थंडी तशी कमी वाजते. पण थंडीमध्ये कोकणात फिरायला तेही पहाटे बाइक वरून खूप प्रसन्न वाटतं. मोकळे रस्ते, थंडगार वारा त्यासोबत मी आणि माझी बाइक, वाट पाहते आहे मी सुट्टीची परत हे सगळं अनुभवायला.