कडोंमपामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

कल्याण : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ध्वजवंदन करुन तिरंग्याला सलामी दिली. 
 
या समारंभात महापालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे, इतर अधिकारी, माजी पालिका सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यासमयी अग्निशमन दल, सुरक्षा दल व स्थानिक पोलीस दल यांनी संचलन करून मानवंदना दिली.
 
 यावेळी अग्निशमन व आणिबाणी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या १४ गुणवंत सफाई कर्मचा-यांना, उपस्थित अधिकारी व पालिका सदस्य यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तु प्रदान करून सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते मुरबाड येथील नवचैतन्य लोकसंचालित साधना केंद्र यांच्या महिला बचत गटातील शेतकरी महिला सभासदांना उंबर्डे येथील कंपोस्ट खत विनामूल्य वितरित करण्यात आले. हे कंपोस्ट खत बचत गटांच्या महिला सदस्यांना दरमहा विनामूल्य स्वरूपात देण्यात येणार आहे.
 
प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली (पूर्व) विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी ध्वजवंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली. याप्रसंगी परिमंडळ 2 चे उपायुक्त अवधुत तावडे, माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तद्नंतर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सचान यांचे बंधू तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.