ठाणे: संबंध महाराष्ट्रात संगीत, संस्कृती आणि कलाविष्काराचा अद्भुत संगम म्हणून प्रसिद्ध असलेला ठाणे फेस्टिवल उद्या २६ जानेवारीपासून सुरू होत आहे.
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेने ९० फूट रोड, पारसिक नगर, कळवा येथे हा फेस्टिव्हल आयोजित केला आहे. लोककलेपासून शास्त्रीय नृत्य, खवय्यांसाठी खाद्यजत्रा आणि संगीतप्रेमींसाठी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, विशाल मिश्रा आणि शान या आघाडीच्या पार्श्वगायकांना ऐकण्याची संधी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ते २८ या तीन दिवसात सायंकाळी ६ वाजता कला, क्रीडा, शास्त्रीय तथा पाश्चात्य संगीत, नृत्य, शिल्पकला यांचा सुरेख संगम या फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.
पहिल्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची जुगलबंदी रसिकांना ऐकता येणार आहे. लाखो तरुणाईच्या गळ्यातील ‘ताईत’ म्हणून ओळखला जाणारा; कबीर सिंग – ऍनिमल फेम विशाल मिश्रा हा २७ जानेवारी रोजी आपल्या गीत- संगीताने तरुणाईला बेधुंद करणार आहे. तर, २८ जानेवारी रोजी आपल्या सुरेल आवाजाने शेकडो चित्रपटांना अजरामर करणारा प्रख्यात गायक शान हा ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे. कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम् आदी नृत्याविष्कार, बिट बॉक्सिंग, सायकलिंग आदी कला-क्रीडाविष्कार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. शिवाय, स्ट्रीट डान्स, लावणी, लिरीकल बिट्स डान्स आदी स्पर्धादेखील या फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत. तर खवय्यांसाठी विशेष खाद्य स्टॉल लावले जाणार असून त्याठिकाणी मालवणी, पंजाबी, चायनीज, कोल्हापुरी, खान्देशी, वऱ्हाडी, वैदर्भीय खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे.
कला, संस्कृती, संगीत-गीतगायन या सर्वाना एकाच छताखाली आणण्याची किमया संघर्ष या संस्थेने केली असून या ठाणे फेस्टिव्हलमध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.