कल्याण: अयोध्येत झालेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनाआणि मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर देशामध्ये दोनवेळा दिवाळी साजरी करण्यात येईल अशी भावना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
कल्याण पूर्वेतील चक्कीनाकास्थित गुण गोपाल मैदानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि श्री राम जन्मभूमी उत्सव समितीतर्फे आयोजित जय श्रीराम या काव्यात्मक महानाट्याच्या प्रयोगानंतर ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते.
अयोध्येला जाणे शक्य नसणाऱ्या रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी कल्याण पूर्वेतील गुण गोपाळ मैदानात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या भव्य प्रतिकृतीला दररोज हजारो रामभक्त दर्शन घेत आहेत. तसेच त्याशेजारील मैदानामध्येही आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना रामभक्तांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कल्याण चक्की नाका येथील राम मंदिर प्रतिकृतीची दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्यने येत आहे. याच पार्श्वभूमीवर येते आठवडाभर ही प्रतिकृती रामभक्तांसाठी खुली राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह देशातील कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. दिवाळीप्रमाणे गेले दोन दिवस प्रत्येक गल्लीमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे देशामध्ये यापुढे 22 जानेवारी आणि नेहमीच्या दिवाळी सणाच्या निमित्ताने अशी दोन वेळा साजरी केली जाईल.
मैदानात सादर करण्यात आलेल्या ” जय श्रीराम” हे काव्यात्मक नाट्य पाहण्यासाठी रामभक्तांची अलोट गर्दी जमली होती. सुप्रसिद्ध कलाकार पुनीत इस्सार यांची प्रमुख भूमिका असलेल्या अत्यंत सुंदर अशा महानाट्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आनंद लुटला. यावेळी कारसेवकांचाही सत्कार करण्यात आला.