* मतदारसंघात भव्य महाआरती
* अयोध्येहून ११ पुरोहित येणार
ठाणे : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक हे श्री राम भक्तांना ५१ हजार किलो साखर प्रसाद म्हणून वाटप करणार आहेत.
मतदारसंघात दोन ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून त्याठिकाणी प्रत्येक भक्ताला एक किलो साखर प्रसाद म्हणून देऊन आनंद जल्लोष केला जाणार आहे. फटाके फोडून, ढोल ताशे वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येणार आहे. ठाणे शहरामध्येही श्री राममय वातावरण तयार झाले असून २२ जानेवारीला दिवाळी साजरी करणार आहोत, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
मतदारसंघात दोन ठिकाणी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी महाआरती करण्यासाठी उत्तर प्रदेश जबलपूर येथून खास ११ पुरोहित बोलावण्यात आले आहेत. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर जशी महाआरती केली जाते तेच आरती करणारे ब्राम्हण आणि तसेच मोठे दिवे आरतीसाठी ठाणे शहरात महाआरतीच्या ठिकाणी आणण्यात येणार आहेत, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
महाआरतीच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येणार असून उपवन येथे म्युझिकल फाऊंटनचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. श्री राम नाम संकीर्तन, शोभा यात्रेमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचा पेहराव परिधान केलेल्या कलावंतांचा समावेश असेल. असे विविध कार्यक्रमही ठाणे शहरामध्ये शिवसेनेकडून आयोजित करण्यात आले आहेत. तसेच प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह दृश्ये स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहेत.