मुंबई: मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या पूर्वीही सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत, तसेच ते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. आदित्य ठाकरे यांची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाण ठरवायचे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे.
मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत 100 कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला असून ईडीने आता त्यावर कारवाई सुरू केली आहे.
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं.
सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.