कळवा रुग्णालयात ‘त्याला’ मिळाले जीवदान; शस्त्रक्रिया करुन काढल्या कामगाराच्या पायातील सळ्या

ठाणे: वर्तकनगर येथील रौनक रेसिडेन्सी या बांधकाम सुरु असलेल्या तळ अधिक २६ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन कोसळून भीमनगर येथील जयराव सरदार (१९) हा तरुण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. कळवा रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून सळई बाहेर काढून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

घटना घडल्यानंतर त्याच्या कंबरेतून आत शिरलेली सळई सुरुवातीला कटरने काढण्यात आली. त्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन उर्वरित सळई बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वर्तकनगर, भीमनगर येथे रौनक रेसिडेन्सी इमारत क्रमांक-५४ या तळ अधिक २६ मजली इमारतीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी
इमारतीच्या बाजूने बांधकामाकरिता उभारलेल्या लोखंडी सळ्यावरती जयराव हा तरुण पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यावेळी जयराव हा या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली तळमजल्यावर कोसळल्यानंतर त्याच्या दोन्ही पायांमध्ये लोखंडी सळ्या गेल्याचे आढळले.

त्या सळ्या तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने कापण्यात आल्या. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पार्श्वभागासह पायात रुतलेली सळई बाहेर काढण्यात आली. त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. तो या इमारतीचा कामगार नसूनही तिथे नेमकी कोणत्या कारणांसाठी शिरला होता, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.