ठाणे: वाहतूक नियमांचे पालन न करता वाहतूक पोलिसांबरोबर जुगाड केला जातो, तो एखाद्याच्या जीवावर उठतो, त्यामुळे पोलिसांनी आणि वाहनचालक आणि मालक यांनी मानसिकता बदलायला हवी, असे प्रतिपादन ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले.
वाहतूक सुरक्षा अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. टीप टॉप प्लाझा येथे या अभियानाला सुरुवात करण्यात आली. आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, सहपोलीस आयुक्त दत्ता कराळे, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड आदी यावेळी उपस्थित होते.
देशात मागील वर्षी एक लाख 60 हजार नागरिकांचे मृत्यू झाले, म्हणजे दिवसाला ४९२ जण मृत्यूमुखी पडले होते. हे मृत्यू रोखता आले असते, परंतु वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष झाले. अपघात घडण्यास रस्ता, वाहन आणि चालक जबादार असतात. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतूक पोलिसांबरोबर जुगाड केला जातो, तसेच परिवहन विभागात देखिल जुगाड केला जातो. या जुगाडामुळे दंडातून किंवा शिक्षेतून सुटका होऊ शकते, असा फाजील आत्मविश्वास निर्माण होतो, त्यामुळे हा जुगाड एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. वाहतूक नियमांबाबत भारतीयांनी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे आयुक्त श्री. डुंबरे म्हणाले. लहान मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती केली तर आई वडिलांना ते नियम पटवून देऊ शकतात असे देखिल आयुक्त डुंबरे म्हणाले. ठाण्यातील रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असून ठाणे पोलिसांनी अपघात होणारी ठिकाणे शोधून ती कमी केली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. अपघाताची ठिकाणे ठाणे पोलिस हद्दीत राहूच नयेत याकरिता सर्व सरकारी यंत्रणांबरोबर समन्वय ठेवावा, असे आवाहन श्री. डुंबरे यांनी केले.
वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. विरुद्ध दिशेने वाहने चालवणे, सिग्नल मोडणे हे आपल्या अंगवळणी पडले असून ठाणेकरांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियमाच्या बाहेर जाऊन उपाययोजना करण्यास तयार असल्याचे आयुक्त श्री.बांगर म्हणाले.
आ संजय केळकर, आ निरंजन डावखरे, सहपोलीस आयुक्त दत्ता कराळे, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी देखिल त्यांचे विचार मांडले.
वाहतूक सुरक्षेचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार संजय केळकर यांनी वाहतूक सुरक्षेबाबतचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी सरकारकडे केली. तसेच याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. वाहतूक सुरक्षेबाबत स्थानिक नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे असून त्यामुळे लोकहीत जोपासणे सोपे होईल, असे श्री केळकर म्हणाले.