नवी दिल्ली : केंद्र सरकारने एका दिवसात एक लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर बंदी घातली होती. मात्र, आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता पाच लाख रुपयांचे यूपीआय पेमेंट एकावेळी करता येणार आहे. मात्र, यामध्ये काही अटी आहेत. ज्या सर्व वापरकर्त्यांना माहित असणं आवश्यक आहे.
एनपीसीआयने रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक संस्थांच्या पेमेंटसाठी एकावेळी पाच लाख रुपयांच्या ऑनलाइन पेमेंटमध्ये सूट दिली आहे. हा नवा नियम 10 जानेवारीपासून लागू होणार आहे. यानंतर, वापरकर्ते सर्व शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी एकावेळी जास्तीत जास्त पाच लाख रुपये भरू शकतील. यासाठी एनपीसीआयने बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना ॲडव्हायजरी जारी केली आहे.