श्री मलंगगड हरिनाम सप्ताहाला हरिभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन

कल्याण: मलंगगडाचा हा सर्व परिसर वारकरी संप्रदायाच्या मूळ पिठाचा, मच्छिंद्रनाथांचा असल्याने वारकरी संप्रदायाचे मूळ या भागात आहे. त्यामुळे हा केवळ सप्ताह नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शास्त्री महाराज, वारिंगे महाराजांनी केलेलं हे धर्माचे काम असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. निवृत्त महाराज देशमुख यांनी केले.

श्रीमलंगगड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले. यावेळी इंदुरीकर महाराजांनी या सप्ताहाला उपस्थित वारकऱ्यांच्या प्रचंड संख्येला पाहून वारकरी संप्रदायाने त्यांची ताकदही दाखवून दिल्याचेही सांगितले.

कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय श्री मलंगगड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला असून वारकरी संप्रदाय आणि भाविकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मलंगगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात मंगळवारपासून हा सप्ताह सुरू झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे या हरिनाम महोत्सवाचे स्वागतोत्सुक असून त्यांनीही उत्सवाच्या उदघाटन प्रसंगी दिंडी आणि रिंगण सोहळ्यात आवर्जून सहभाग दर्शविला होता. या सप्ताहातील पहिले दोन दिवस ह.भ. प. संजयनाना धोंडगे आणि ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख अर्थातच इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आख्यान ऐकण्यासाठी सर्व हरिभक्तांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शविली. अंबरनाथच नव्हे तर आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून सप्ताहाचा आनंद घेत आहेत. या हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज म्हणजेच इंदुरीकर महाराजांनी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी शैलीतून समाजातील नकारात्मकतेविषयी उपस्थित श्रोत्यांचे प्रबोधन केले. मलंगगडाचा हा सर्व परिसर वारकरी संप्रदायाच्या मूळ पिठाचा- मच्छिंद्रनाथांचा असल्याने वारकरी संप्रदायाचे मूळ या भागात आहे. त्यामुळे हा केवळ सप्ताह नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शास्त्री महाराज, वारिंगे महाराजांनी केलेलं हे धर्माचे काम असल्याचे सांगत या सप्ताहाने वारकरी संप्रदायाची ताकदही दाखवून दिल्याचे ते म्हणाले.

या सप्ताहातील पहिले दोन्ही दिवस अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वतावरणात संपन्न झाले. या किर्तन सोहळ्यासाठी दररोज केवळ मलंग गड परिसरच नव्हे तर कल्याण, अंबरनाथ, ठाणे,पनवेल आदी भागातील हजारो वारकरी बंधू आणि भगिनी उपस्थित राहत आहेत. आसपासच्या परिसरातील शालेय विद्यार्थीही या सप्ताहात पोथी पारायणासाठी बुधवारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री प्रभू श्रीरामांचे क्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचेही या किर्तन सोहळ्यामध्ये भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.