कासाऱ्यात हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले

पोलिसांचे धाडसत्र सुरूच

कसारा : कसारा भागात पोलिसांचे धाडसत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच असून आज टाकण्यात आलेल्या धाडीत हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली.

गेल्याच आठवड्यात येथील राड्याचा पाडा वस्तीजवळील जंगलात पोलिसांनी धाड टाकून भट्ट्या उद्ध्वस्त केल्या असतानाच निगरगट्ट दारू माफियांनी पुन्हा आपला व्यवसाय निर्धोकपणे सुरू केल्याची माहिती मिळताच शहापूर एसडीपीओ मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलिस निरिक्षक रमेश तडवी यांनी आपल्या सहका-यांसह याच परिसरात पुन्हा धाड टाकली.

या धडक कारवाईत गावठी दारू बनविण्यासाठीचा गूळ आणि नवसागरमिश्रित रसायन, 200 लिटरचे प्लास्टिकचे तीन ड्रम असा एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जाळून नष्ट केला. या सामूहिक कारवाईत स्वतः पोलीस निरिक्षक रमेश तडवी यांच्यासह सहायक फौजदार अण्णा पगार, पोलीस हवालदार निकम, पोलीस शिपाई लांडे यांचा समावेश होता.

वृत्त हाती येईपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. हा गूळ आणि नवसागरमिश्रीत रसायन कुठून येते, याचाही शोध घेणे गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.