भाजपाचा डोळा…मतदारसंघ ओवळा !

आनंद कांबळे/ठाणे

राज्यातील भारतीय जनता पक्षाचे मोठे कार्यालय ठाण्यात आकार घेत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा असलेल्या कार्यालयातून जिल्ह्यातील भाजपाची ताकद वाढवली जाणार आहे. याच कार्यालयातून ओवळा माजिवडा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न भाजपा करणार आहे.

वर्तकनगर येथिल रेमंड येथिल भूखंडावर सुमारे १३,५०० चौरस फूट जागेत हे कार्यालय उभारण्याचे काम सुरु आहे. तळ अधिक दोन मजल्याच्या कार्यालयात अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कॉन्फरन्स रूम, पत्रकार परिषद घेण्यासाठी स्वतंत्र हॉल, वॉर रूम, प्रत्येक विभागाच्या सेलच्या अध्यक्षांना स्वतंत्र कक्ष या कार्यालयात तयार केले जाणार आहेत. येथून जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोडले जाणार आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका येथे घेतल्या जाणार आहेत. तशी सोय येथे करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधी हे कार्यालय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याचा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या २४ जागा काबीज करण्याची व्यूहरचना येथे आखली जाणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. हे संख्याबळ आणखी वाढविण्याचा प्रयत्न या कार्यालयातून होणार आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघात भाजपाला मानणारा वर्ग आहे, परंतु भाजपा-सेना युतीमुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. या मतदार संघावर भाजपाचा डोळा आहे.

२०१४ साली भाजपच्या नवख्या संजय पांडे यांनी या मतदारसंघात सेना आमदार प्रताप सरनाईक यांना कडवी झुंज दिली होती, त्यामुळे भाजपा या मतदार संघावर दावा करण्याची शक्यता देखिल आहे. हा मतदारसंघ मीरा-भाईंदर आणि ठाणे या दोन शहरांत विभागला गेला आहे. मीरा-भाईंदर आणि घोडबंदर भागात भाजपाची ताकद असल्याने भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी या मतदारसंघातून नशीब आजमावण्यासाठी येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच या मतदार संघावर भाजपाचा डोळा असल्याचा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.

कोणत्या मतदार संघातून कोणी निवडणूक लढवायची, याचा निर्णय महायुतीमधील वरिष्ठ नेते घेणार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडणार हे वरिष्ठ ठरवतील, असे भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले म्हणाले.