वर्षभरात एक लाख ५१ हजार प्रकरणे, २६ लाखांचा दंड वसूल
ठाणे : कितीही दंड आकारा, आम्ही ठाणेकर हेल्मेट वापरणारच नाही, असा पवित्रा वाहनचालकांनी घेतला आहे काय, असा प्रश्न उपस्थित करणारी आकडेवारी वाहतूक पोलिसांकडून मिळाली आहे. २०२३ या वर्षात हेल्मेट न घातल्याची एक लाख ५१ हजार प्रकरणे झाली असून त्यातून २६ लाख सहा हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
मागील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये वाहतुकीचे नियम मोडणारी एकूण नऊ लाख ५४,७१६ प्रकरणे झाली असून त्यातून आठ कोटी ३२ लाख ८०,३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सन २०२२ या वर्षात एकूण नऊ लाख ८०,५७१ प्रकरणे झाली. त्यावेळी चार कोटी ३३ लाख ४५,८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मागील दोन वर्षांत झालेल्या प्रकरणांमध्ये फारसा फरक नाही, पण तरीही दंडाचा फरक निम्म्याने आढळून येत आहे.
वेगाने दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरण्याची स्टाइल अनेकांच्या अंगाशी येते, अनेक अपघात होऊन अनेकदा जीवही जातो. त्यामुळे वाहतूक शाखेने हेल्मेट वापरण्याबद्दल समज देऊन जनजागृतीही नियमितपणे केली आहे. मात्र त्याचा धडा दुचाकीस्वारांनी नीट घेतला नाही हेच मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. २०२३ या वर्षात हेल्मेट घातले नाही म्हणून एक लाख ५१,९०१ जणांवर कारवाई करण्यात आली. यात २६ लाख सहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. २०२२ मध्ये अशी एक लाख ५३,३८२ प्रकरणे होऊन ३१ लाख ३५ हजारांचा दंड आकारण्यात आला.
२०२३ मध्ये रस्त्यांवर कुठेही वाहने उभी करून वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या एक लाख ६४,९९१ जणांवर कारवाई करून ८७ लाख १५,३०० रुपयांचा दंड केला आहे.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या १०,९४५ चालकांवर कारवाई करून सात लाख ४० रुपये दंड आकारणी करण्यात आली. सिग्नल तोडून बेफाम वाहने चालवणाऱ्या एक लाख २३ हजार जणांवर कारवाई करून तब्बल ३२ लाख ३८,४०० रुपये दंड आकारण्यात आला.
२०२३ या वर्षांत १,२१४ पोलीस आणि पत्रकार नसलेल्या वाहन चालकांनी त्यांच्या वाहनांवर स्टीकर्स लावल्यामुळे त्यांच्याकडून एक लाख ४२ हजार रुपये दंड ठोठावला.