वडवलीत रेव्ह पार्टीवर छापा; झिंगलेले ९५ पुरुष-महिला ताब्यात

आयोजकांसह लाखोंचे अमली पदार्थ जप्त

ठाणे: नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवणाऱ्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकत दोन आयोजकांसह अमली पदार्थ सेवन करून झिंगलेल्या ९५ पुरुष आणि महिलांना ताब्यात घेतले. यावेळी लाखोंच्या अमली पदार्थांसह डीजे यंत्रणा, वाहने आदी साहित्य जप्त करण्यात आले.

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांची विक्री आणि सेवन केले जाते. अशा पार्ट्यांवर नजर ठेऊन कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री वडवली खाडीकिनारी एका निर्जनस्थळी दोन इसमांनी नवयुवकांकरीता अमली पदार्थांच्या विक्रीसह रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शोध- १, यांचे नेतृत्वाखाली घटक-५ व घटक २ कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी रविवारी पहाटे ३ वाजता वडवली खाडीकिनारी छापा कारवाई केली.

यावेळी तेथे ९० पुरूष आणि पाच महिला, या अमली पदार्थाचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना आढळून आले. या पार्टीचे आयोजन करणा-या दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चरस ७० ग्रॅम, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, बिअर/वाईन/व्हिस्की असा सुमारे आठ लाख ३,५६० रुपयांचा अंमली पदार्थ आढळून आला आहे.

घटनास्थळावरून गांजा पिण्याचे साहित्य साधने, डीजे मशिन, २९ मोटार सायकली आदी साहित्य आढळून आले. त्याबाबत एनडीपीएस ॲक्ट, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) निलेश सोनावणे, गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगे-पाटील, अविनाश महाजन, पोलीस उप निरिक्षक तुषार माने, पोलीस हवालदार सुनिल निकम, विजय काटकर, रोहीदास रावते, जगदीश न्हावळदे, सुशांत पालांडे, विजय साबळे, मिनाक्षी मोहीते, माधव वाघचौरे, सुनील रावते, पोलीस नाईक तेजस ठाणेकर, रघुनाथ गार्डे, उत्तम शेळके, पोलीस शिपाई यश यादव यांनी तसेच गुन्हे शाखा घटक २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन गायकवाड, सहायक पोलीस निरिक्षक सचीन ढोके, पोलीस हवालदार राजेंद्र राठोड, रविंद्र साळुंखे, जितेंद्र भोईर, माया डोंगरे, श्रेया खताळ, पोलीस शिपाई जालिंदर साळुंखे, ठाकुर या पथकाने कारवाई केली आहे.