ग्रिहिथाने नऊवारीत सर केला तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा

ठाणे: नाताळची सुट्टी म्हटली की खेळणे, फिरायला जाणे म्हणजे खुप खूप मज्जा करणे, असा एककलमी कार्यक्रम बच्चे कंपनीचा असतो. महाराष्ट्राची हिरकणी आणि ठाणेकर असलेली अवघ्या नऊ वर्षाची ग्रिहिथा हिने या सुट्टीत आभाळाला भिडू पाहणारा लिंगाणा नऊवारी साडी नेसून सर केला.

ग्रिहिथाच्या आजवरच्या यशामध्ये अजून एका कामगिरीची भर पडली आहे आणि ती म्हणजे, हिंदवी स्वराज्याचे कारागृह अशी ओळख असलेला किल्ले लिंगाणा ग्रिहिथाने २४ डिसेंबर २०२३ रोजी सर केला.

लिंगाणा हा चढाईस अतिशय कठिण, दमछाक करणारा व अवघड श्रेणीत गणला जाणारा किल्ला असला तरी ग्रिहिथाने एका अनोख्या पध्दतीने हा किल्ला सर केला. ग्रिहिथाने सकाळी लवकर, मोहरी ह्या बेस गावापासून सुमारे एक दीड तासाची पायपीट करून रायलिंग पठार गाठले. रायलिंग पठारावरुन सुमारे १५००-२००० हजार फूट खोल दरी आणि वर महाराष्ट्राची आजवरची सर्वात लांब, म्हणजेच, सुमारे एक हजार फूट लांबीच्या झिप लाईनवर झिप लायनिंग करून लिंगाणाचा पायथा गाठला. त्या पुढे गिर्यारोहणासाठी लागणारे सर्व साहित्य परिधान करून चढाई सुरु केली.

सुमारे तीन तासांच्या कठीण चढाईनंतर (क्लाइंबिंग, झूमेरींग आदी) ग्रिहिथाने किल्ल्याचे टोक गाठले. तासाभराच्या विश्रांतीनंतर ग्रिहिथाने उतरण्यास सुरुवात केली. सहा टप्प्यांमध्ये रॅपेलिंग करत ग्रिहिथाने किल्ल्याचा पायथा गाठला.

रायगड आणि तोरणा दरम्यान सह्याद्रीच्या मुख्य रेषेवर लिंगाणा हे २९६९ फूट उंच शिखर आहे. याची चढण चार मैल लांबीची आहे. बहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असून महाड शहरापासून ३५ किमी अंतरावर आहे.

अनोख्या पद्धतीने लिंगाणा सर करणे आणि सर्वात कमी वयात प्रथमच एक हजार फूट झिप लायनिंग करून ग्रिहिथाने नवा विक्रम रचला आहे. या मोहिमेत ग्रिहिथाला सर्व तांत्रिक साहित्य, मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य ॲडवेंचर ट्रेक्सचे आयोजन करणारे सुप्रसिद्ध महादुर्ग ॲडवेंचरचे
अक्षय जमदारे, ऋषिकेश बापरडेकर, कल्पेश बनोटे, नितेश पाटील, खुषल बेंद्रे, वैभव मंचेकर आणि लिव्हिंग द ॲडवेंचरच्या अनंता मर्गले, सूरज नेवासे, अमोल तळेकर, श्रीनाथ पवार आणि कृष्णा मर्गले या टीमने केले.

ग्रिहिथाने वयाच्या सातव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात ऊंच कळसूबाई शिखर, आठव्या वर्षी नेपाळमधला माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि नवव्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर टांझानिया येथील माउंट किलीमांजारो सर केला आहे. महाराष्ट्रातील चढाईसाठी अति कठीण मानले जाणारे काही गड किल्ले आणि सुळके जसे मोरोशीचा भैरवगड, मल्लंगड, तैल बैला, हरिहर, वजीर सुळका, नवरा नवरी सुळके इत्यादी देखील ग्रिहिथाने सर केले आहेत.