कचऱ्याचे डोंगर हटणार; उद्यान आणि रिंग रूट होणार!

तब्बल ४० वर्षांनी आधारवाडीतील कचरा हलवणार

कल्याण : आधारवाडी क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे डोंगर तब्बल ४० वर्षांनी हटणार असून त्याजागी आगामी काळात उद्यानाचे नियोजन आहे तर रिंग रुटसाठी ४० मीटरची जागा उपलब्ध होणार आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याने परिसर मोकळा श्वास घेणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर गेल्या ४० वर्षापासून दररोज कचरा टाकण्यात येत होता. मे २०२१ पासून आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंडवर दैनंदिन कचरा टाकणे पूर्णत: बंद करण्यात आले आहे. डम्पिंग ग्राऊंडवर जुन्या साचून असलेल्या कच-यावर बायोमायनिंगद्वारे विल्हेवाट लावणे आणि जागेची पुर्नप्राप्ती करुन घेणे या कामातील टप्पा क्र. १ च्या कामाचे कार्यादेश मे.नेकॉफ इंडिया लि. या कंपनीस ४ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आला आहे.

या कामासाठी “स्वच्छ भारत अभियान २.०” अंतर्गत रक्कम रु. ४२.४७ कोटी रक्कम शासनाने मंजूर केली आहे. सद्यस्थितीत डम्पिंग ग्राऊंडवरील साचून असलेल्या कच-यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया (बायोमायनिंगद्वारे) करण्यासाठी आवश्यक मशिनरी, वे-ब्रीज इत्यादी साहित्य सामुग्री ठेवण्यासाठी बेस तयार करणे व वाहतुकीसाठी कच्चा रस्ता तयार करणे इ. कामे सुरु करण्यात आली आहेत. कच-यावर प्रक्रिया करण्याचे काम अद्याप सुरु केलेले नसल्याने कुठल्याही प्रकारचा कचरा डम्पिंग ग्राऊंडवरुन बाहेर पाठविण्यात आलेला नाही.

कच-यावर प्रक्रिया करण्याची मशिनरी व वे-ब्रीज बसविल्यानंतर साचलेल्या कच-यावर बायोमायनिंग पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रक्रियेनंतर रिसायकल मटेरियल, खत व रिजेक्टस कचरा प्राप्त तयार होणार आहे. या रिजेक्टस कचरा खदानीमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने टाकण्यात येणार आहे. ही प्रक्रिया करताना जुना साचलेला कचरा हटविताना त्यात निर्माण‍ झालेला मिथेन वायु बाहेर पडणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात दुर्गंधी पसरुन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर उपाययोजना करण्यात येणार असून सदर कच-यावर दुर्गंधी नाशक फवारणी करण्यात येणार आहे व अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या टप्पा क्र. १ च्या कामामध्ये ३०टक्के जागा मोकळी होणार असून त्यामुळे ४५ मीटर जागा रिंगरोडकरीता उपलब्ध होणार आहे.