ठाणे : ठाणे महापालिकेने बजावलेल्या कामगिरीमुळेच शहरातील शहरीकरणास बकालपणा आला नाही. त्याचा प्रत्यय मुलांनी रेखाटलेल्या आशा-चित्रांतून आला, असे मत ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.
ठाणेवैभव आयोजित आणि वाविकर आय इन्स्टिट्युट प्रायोजित ‘व्हिजन-२०३०’ कार्यक्रमाचे उदघाटन श्री. म्हस्के यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते.
ठाण्यात सुरु असलेल्या विविध नागरी प्रकल्पांची माहिती देताना श्री. म्हस्के यांनी भविष्यातील योजनांचा ऊहापोह केला. ‘देशातील कानाकोपऱ्यातून येणारे नागरिक ठाण्याला पसंती देत आहेत. त्यावरून येथील महापालिका आणि नगरसेवक चांगले काम करीत आहेत हे सिद्ध होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे.’ असेही ते म्हणाले.
‘व्हिजन-२०३०’ उपक्रमाचे कौतुक करताना श्री. म्हस्के म्हणाले की जनतेचा सहभाग मिळवणे महत्वाचे असते. ठाणेवैभव हे काम सातत्याने अशा अभिनव उपक्रमांद्वारे करीत आहे. नागरिकांच्या डोळ्यांची काळजी घेणाऱ्या डॉ. चंद्रशेखर वाविकर यांनी उद्याच्या नागरिकांना दृष्टी दिली, असेही ते म्हणाले.
श्री. म्हस्के यांनी जातीने सर्व मॉडेल्सची पाहणी करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘या मुलांच्या कल्पनांना दाद द्यायला हवी. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कर्तव्य रहाणार आहे. व्हिजन २०३० च्या निमित्ताने मुलांना विचार मांडण्याचे व्यासपीठ मिळाले असे ते म्हणाले.