मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
ठाणे : राज्यातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरीस असणाऱ्या खेळाडूंना नोकरीत कायम करण्यासाठी धोरण तयार कराणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधवर फाऊंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी माजी आमदार रविंद फाटक, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, प्रशांत जाधवर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत जाधवर, माजी सभागृह नेते अशोक वैती, ठाणे जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धेतील कुमारांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने विजयासह नारायण नागु पाटील स्मृती फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. तर या गटात पिंपरी चिंचवडचा संघ उपविजेता ठरला. कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघाने प्रथम क्रमांकासह क्रीडाशिक्षक चंदन सखाराम पांडे स्मरणार्थ फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. तर पुणे ग्रामीण संघाने उपविजेतेपद पटकावले.
कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम संघाने पिंपरी चिंचवड संघावर २७-१५ अशी मात करीत विजय मिळविला, मध्यंतराला मुंबई उपनगर पुर्व संघाकडे १०-८ अशी नाममात्र आघाडी होती. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सुरवातीपासूनच एकमेकांना अजमावत सावध खेळ करीत होते. मात्र मध्यंतरानंतर पिंपरी चिंचवडच्या संघाचा अनुभव कमी पडला व उपनगर पश्चिमचे आक्रमण थोपविण्यात आणि बचाव भेदण्यात यशस्वी झाले नाहीत. मुंबई उपनगर पश्चिमच्या रजत सिंग व ओम कुडले यांनी सुरवातीपासुनच आक्रमक खेळ केला. त्यांनी पहिल्या डावात २ बोनस गुण मिळविले, तर दुसऱ्या डावात २ बोनस गुणांसह एक लोणाचे दोन गुण मिळविले. त्यांना दिनेश यादव यांनी चांगल्या पकडी घेतल्या. पिंपरी चिंचवडच्या देवेंद्र अक्षुमनी व ऋषिकुमार शर्मा यांनी सावध खेळ करीत उपनगर पश्चिमचा बचाव भेगृदण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही, विक्रम पवार यांने काही चांगल्या पकडी घेतल्या.
कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघाने पुणे ग्रामीण संघावर ४४-२७ अशी मात करीत स्पर्धेचे विजेतपद मिळविले. पुणे जिल्ह्याचे तीन विभाग झाल्यानंतर प्रथमच झालेल्या या स्पर्धेत पुणे जिल्हयाने चांगली कामगिरी करीत स्पर्धेचे विजेत व उपविजेते पद मिळविले.
मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे ३०-८ अशी भक्कम आघाडी होती. पिंपरी चिंचवड संघाच्या मनिषा रोठोड व आर्या पाटील यांनी चौफेर चढाया करीत पुणे ग्रामीण संघावर सहज विजय मिळविला. पिंपरी चिंचवडच्या सिफा वस्ताद व भूमिका गोरे यांनी चांगल्या पकडी घेत विजयात म्हत्त्वाची भूमिका बजावली. मनिषा राठोड व आर्य़ा पाटील यांनी ९ बोनस गुण मिळविले. तर दोन लोण लावत चार गुण देखील मिळविले. पुणे ग्रामीणच्या साक्षी रावडे व झुवेरिया पिंजारी यांनी चांगला प्रतिकार केला मात्र त्यांना मनिषा राठोडचे आक्रमण थाबविता आले नाही. श्रुती मोरे हिने सुरेख पकडी घेतल्या. पुणे ग्रामिण संघाच्या साक्षी रावडे व झुवेरिया पिंजारी यांनी ४ बोनस सह एक लोणाचे २ गुण मिळविले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेविका राधाबाई सुभाष जाधवर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगलदास पांडे, कार्य़ाध्यक्ष मनोज पाटील, सरकार्यवाह मालोजी भोसले, विठ्ठल क्रीडा मंडळाचे अॅड किरण जाधव, सचिव संतोष पाटील यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुमार गट तृतीय क्रमांक पुणे ग्रामीण, चतुर्थ क्रमांक नंदुरबार तर कुमारी गट तृतीय क्रमांक मुंबई उपनगर पूर्व तर चतुर्थ क्रमांक कोल्हापूर संघाने पटकावला.