मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचे कमळ

तेलंगणात काँग्रेसचा धुरळा
मुंबई: पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून त्यापैकी तीन राज्यांवर भाजपने सत्ता मिळवल्याचं स्पष्ट झाले आहे. तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. मिझोराम राज्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. राजस्थानमध्ये 115, मध्य प्रदेशमध्ये 164 तर छत्तीसगडमध्ये 54 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
…………………………………………….
राजस्थान: एकूण जागा 199
भाजप : 115
काँग्रेस : 69
इतर : 15
………………………………………..
मध्य प्रदेश : एकूण जागा 230
भाजप : 164
काँग्रेस : 65
इतर : 01
………………………………………
छत्तीसगड : एकूण जागा 90
भाजप : 54
काँग्रेस : 35
अन्य -01
……………………………….
तेलंगणा: एकूण जागा 119
काँग्रेस : 64
बीआरएस : 39
भाजप : 08
एमआयएम : 08
टक्केवारीत काटे की टक्कर
भाजपा आणि काँग्रेसने जिंकलेल्या जागांमध्ये मोठा फरक असला तरी मतदानाच्या टक्केवारीत काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाला ४६.३४ टक्के मतदान झाले असून काँग्रेसला ४२.१२टक्के मतदान झाले आहे. राजस्थानमध्ये भाजपाला ४१.७३टक्के तर काँग्रेसला३९.५४ टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशात भाजपाला ४८.६८ टक्के तर काँग्रेसला ४०.४५ टक्के मतदान झाले आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसला ३९.४७ टक्के, बीआरएसला ३७.४० टक्के तर भाजपाला १३.९१ टक्के मतदान झाले.
मिनी लोकसभा असे समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ती आता खोटी ठरली असून भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विजय प्राप्त केला. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली.

गेल्या पाच वर्षापासून सत्तेत असलेल्या गेहलोत सरकारचा पराभव करून भाजपने राजस्थानच्या सत्तेची चावी स्वतःकडे घेतली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये सुरू असलेली राजकीय गटबाजी काँग्रेसला काही संपवता आली नाही. त्यात भ्रष्टाचार आणि लाल डायरीचा मुद्दा गाजला. दुसरीकडे भाजपने हिंदुत्वाचं कार्ड खेळलं आणि त्याला यश आल्याचे दिसून आले आहे. राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.

गेल्या 20 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असून त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी असल्याची चर्चा होती. त्यासाठी भाजपने आपल्या काही केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचीही ताकद भाजपच्या कामी आली. त्यामुळे या राज्यात पाचव्यांदा भाजपने सत्ता मिळवली आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचे चित्र असताना भाजपने या राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजपने या राज्यात 54 जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या वाट्याला 35 जागा आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला चेहरा बनवला होता, त्याचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसून आलं.

गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा पराभव करत काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली आहे. केसीआर यांच्या पक्षाला 39 जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसने या ठिकाणी 64 जागा पटकावल्या आहेत.