कै. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठरली उत्कृष्ट

भारतातील ‘उत्कृष्ट स्टुडंट नर्सेस असोसिएशन’ पुरस्कार प्रदान

ठाणे: नाशिक येथे नुकतेच स्टुडेंट नर्सेस असोसिएशनचे 30 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. अधिवेशनात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या कै. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेस भारतातील ‘उत्कृष्ट स्टुंडट नर्सिंग असोसिएशन युनिट’ हे पारितोषिक प्राप्त झाले. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे.

ट्रेंड नर्सेस असोशिएशन ऑफ इंडिया दिल्ली शाखा यांच्यातर्फे त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवी दिल्ली सभागृह नाशिक येथे स्टूडेंट नर्सेस असोसिएशनचे 30 वे राष्ट्रीय अधिवेशन 28 ते 29 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल, नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष टी दिलीपकुमार, ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रॉय उपस्थित होते.

या अधिवेशनात भारतातील 33 राज्यातील विविध परिचर्या संस्थेतील 2894 विद्यार्थी परिचारिकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदरची परिषद भरवली जाते त्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच विद्यार्थी नर्सिंग क्षेत्रातील संशोधन पेपरचे सादरीकरण करतात. स्पर्धामध्ये परिचर्या संबंधित विषयांवर रांगोळी, चित्रकला, पेन्सिल, स्केच, एकपात्री नाटक, वक्तृत्व, नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

अधिवेशनात कै. मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप, महाराष्ट्र राज्य शाखेच्या सचिव वर्षा पाटील, स्टुंडट नर्सिंग असोसिएशनच्या सल्लागार व परिचारिका वैभवी फर्डे, शबाना खान, व प्रचिती तामोरे यांनी सहभाग घेतला. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या सेरेमोनिल परेड मध्ये संस्थेच्या वैभवी फर्डे हिने सहभाग घेऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व या स्पर्धेत भारतातील उत्कृष्ट स्टुंडट नर्सिंग असोसिएशन युनिट हे पारितोषिक प्राप्त केले.

ठाणे महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून भारतातील उत्कृष्ट स्टुडेंट नर्सेस असोसिएशन म्हणून संस्थेने दुसऱ्यांदा सदरचे पारितोषिक प्राप्त केले आहे. सदर स्पर्धेसाठी संस्थेने मागील पाच वर्षात विद्यार्थींनीसाठी घेतलेले उपक्रम, पाच वर्षात राज्य व राष्ट्रीय पातळीवर भरलेल्या अधिवेशनात घेतलेला सहभाग व मिळवलेली पारितोषिके संस्थेने आयोजित केलेली राज्य व राष्ट्रीय विद्यार्थीनी परिषद, विद्यार्थी परिचारिकांसाठी आयोजित विविध कार्यशाळा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर सादर केलेली उत्कृष्ट स्टुंडट नर्सिंग डायरी, जास्तीत जास्त विद्यार्थी परिचारिकांना उत्कृष्ट स्टुंडट नर्सिंग व ट्रेंड नर्सिंग असोसिएशन इंडियाचे मेंबर बनविणे, संस्थेचा रुग्णसेवा, आरोग्य,सामाजिक, व्यावसायिक व इतर उपक्रमांमध्ये सहभाग आदी निकष विचारात घेतले जातात.