ठाणे : दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. तसेच दगडफेकही केली आहे.
जर दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे.
मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेने आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फसले आहे. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसांत आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, दुकानांना मराठी पाट्या असणे आवश्यकच आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुरेशी मुदतही दिली आहे. जे करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जे काळं फासतील त्यांच्याविरोधात केस दाखल करण्यात येईल.
दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
कोर्ट कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, अशी कानउघडणी करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं.