* जलवाहिन्यांचे ५० टक्के काम पूर्ण
* जलकुंभाची कामे प्रगतीपथावर
शहापूर: दरवर्षी पाणीटंचाईने व्याकूळ होणाऱ्या शहापूर तालुक्यातील ३५६ गाव-पाड्यांतील जनतेला पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत असून या गाव-पाड्यांना भावली पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आशेचा किरण दिसू लागला आहे.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या स्वप्नातील भावली पाणीपुरवठा योजना असून या योजनेसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतल्याचे सर्वश्रुत आहे. याकामी प्रकाश पाटील यांचीही खूप मदत झाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
पाणीटंचाई ही शहापूर तालुक्याची प्रमुख समस्या आहे. माळ पठार, कसारा विभाग, शिरोळ-अजनुप विभाग, वाशाळा विभाग, तलवाडा पठार, साकडबाव पठार, डोळखांब विभाग, टाकीपठार, खर्डी आणि बिरवाडी या भागात फेब्रुवारी-मार्च महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई सुरू होते. पाण्याची धरणे खाली आणि गाव उंच पठारावर असल्याने लिफ्ट पाणी योजना यशस्वी होत नाही. या भागातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून भावली योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेला अनेक अडथळे आले मात्र ते पार करून या योजनेच्या कामाला गती येत असल्याचे दिसत आहे.
प्रत्येकाला मिळणार ५५ लिटर पाणी
जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांतील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अनिवार्य आहे.
शून्य पैसे वीजबिल
भावली धरण दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे आहे. हे धरण 590 मीटर उंचीवर आहे. शहापूर भागातील गावे आणि पाडे 220 ते 540 मीटर इतक्या उंचीवर असल्याने भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणी मिळू शकते. यासाठी एक युनिटही वीज खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ही योजना देखभाल व दुरुस्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहीत धरून ती राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
भावली योजनेच्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या योजनेचे प्रामुख्याने २६४ कि.मी. जलवाहिनी टाकणे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरु आहे. ५० टक्के जलवाहिनी टाकून झाली असून पाण्याच्या टाक्यांचीही कामे सुरू आहेत. लवकरात लवकर ही योजना पूर्ण व्हावी यासाठी संबंधित एजन्सीकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिली.