ऐन दिवाळीत नवी मुंबईत पाणीप्रश्न पेटला
नवी मुंबई: अनेक तक्रारी आणि पाठपुराव्यानंतरही पाणीप्रश्न संपत नसल्याने सारसोळे येथील महिलांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
नेरूळमधील सेक्टर ६, सारसोळे येथील स्थानिकांनी विभाग स्तरावर अनेक तक्रारी आणि पाठपुरावा करून देखील पाणी प्रश्न संपत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अखेर संतप्त महिलांनी मनपा आयुक्तांच्या दालनात आंदोलन केले. यावेळी पाणी द्या पाणी द्या अशी मागणी करत महिलांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला.
कोपरी परिसरात दर रविवारी दिवसा पाणी बंद ठेवले जात आहे. मागील रविवारी २४ तास तर बुधवारी सलग २० तास पाणी बंद ठेवण्यात आले होते. याबाबत मनपा पाणीपुरवठा विभाामार्फत कुठलीही सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे पाण्याच्या प्रतिक्षेत येथील रहिवाशांनी रात्री जागल्यानंतर टँकरच्या पाण्यावर तहान भागवली. ऐन दिवाळीच्या तोंडावर परिसरात पाणी संकट निर्माण झाल्याने येथील रहिवाशांनी मनपा विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
घणसोलीतही मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून ही टंचाई कृत्रिम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भागात मुबलक पाणी असले तरी वितरण व्यवस्था ढिसाळ झाल्याने टँकरच्या पाण्यावर अनेक भाग अवलंबून आहेत.
सारसोळे गावात तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून येथील पाणी समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र जलकुंभ बांधण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.