अंबरनाथ: जुन्या मोडकळीला आलेल्या शाळेच्या जीर्णोद्धारासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेत आर्थिक योगदान दिलेच शिवाय विविध सामाजिक संस्था, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांची मदत घेऊन एक मजली इमारत बांधून पूर्ण केली. या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
अंबरनाथच्या पश्चिमेला कामगारांच्या वस्तीत ५० वर्षांच्या जुन्या सुहासिनी प्राथमिक विद्यालयाच्या भगिनी मंडळाची क्रमांक दोनच्या प्राथमिक शाळेत ज्ञानदानाचे कार्य सुरु आहे. चाळीसारख्या वर्गखोल्यांत शिशुवर्ग ते सातवीपर्यंत ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा जीर्ण झाल्याने नवीन शाळा बांधण्याचा प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यपिका विशाखा गोडसे यांनी संस्थेसमोर मांडला. संस्थेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने संस्थेने पाच लाख रुपये निधी दिला. शाळेच्या बांधकामासाठी अंदाजे ४० ते ४५ लाख रुपये खर्च येणार होता. शाळेच्या १६ शिक्षकांनी पुढाकार घेऊन ७० हजार रुपये जमा केले. शाळा क्र. १ मधील शिक्षकांनीही दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर आठ वर्ग खोल्या आणि कार्यालय बांधण्यात येणार आहे.
आमदार डॉ. बालाजी किणीकर, प्रा. भगवान चक्रदेव, मीना कानिटकर, संस्थेच्या सचिव मेघा आठल्ये, सुमती पाटील यांच्यासह पालकांकडून आर्थिक मदत शाळेला मिळाली आहे. याखेरीज माजी विद्यार्थी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी बांधकामाचे लागणारे सिमेंट, खडी यासारखे विविध प्रकारचे साहित्य देऊन शाळा जीर्णोद्धाराला सहकार्य मिळाल्याने शाळेच्या इमारतीचे स्वप्न साकार झाल्याचे मुख्याध्यपिका गोडसे यांनी नमूद केले. कृतज्ञता म्हणून शाळेच्या नव्या इमारतीमधील प्रयोगशाळेला कै. शोभा चक्रदेव यांचे नाव देण्याचा निर्णय शाळेने घेतला आहे.
निधीची कमतरता असल्याने बांधकाम थांबवण्यात आले. विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आणि सीएचएम महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लगेच त्यांच्या पत्नी कै. शोभा चक्रदेव यांच्या समरणार्थ तीन लाखांची देणगी शाळेच्या बांधकामाला दिल्याने बांधकामाने पुन्हा वेग घेतला. शाळेचे ८० टक्के बांधकाम झाले असून उर्वरित कामासाठी दहा लाख रुपये खर्च येणार आहे.
सर्वांच्या सहकार्यातून इमारत साकारली आहे. शाळेच्या बांधकामासाठी सर्वानी सहकार्य केल्याप्रमाणे अन्य नागरिकांनीही आर्थिक पाठबळ दिल्यास शाळेचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्याध्यपिका विशाखा गोडसे यांनी व्यक्त केला.