मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये ४८ वर्षीय रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
कल्याण : हिपॅटायटीस बी संसर्गामुळे शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार असलेल्या कल्याणमधील ४८ वर्षीय रुग्णावर खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉ. विक्रम राऊत यांच्या नेतृत्वाखालील डॉ. अमृतराज सी, डॉ. हिरक पहारी आणि डॉ. अंबरीन सावंत यांच्या टिमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्णाच्या पुतण्याने यकृत दान केले असून प्रत्यारोपणाच्या दोन महिन्यांनंतर दाता आणि प्राप्तकर्ता दोघेही सामान्य जीवन जगत आहेत.
कल्याण येथे राहणारे ४८ वर्षीय रुग्ण अनिल पोरजी यांना १ वर्षापूर्वी कावीळ झाली होती आणि त्यांनी विविध पर्यायी औषधे घेणे सुरु केले मात्र तरी त्यांची कावीळ वाढली. पुढे त्याच्या ओटीपोटात द्रव निर्माण झाल्याने त्याची प्रकृती हळूहळू खालावत गेली आणि नियमितपणे त्याच्या ओटीपोटातून द्रव काढण्याची गरज भासत होती. ओटीपोटात द्रव साचणे, कावीळ आणि हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी मुळे रुग्णाला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला.
31 ऑगस्ट रोजी रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण झाले. त्याच्या पुतण्याने त्याच्या यकृत दान केले आणि शस्त्रक्रियेनंतर आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. भारतात, 80 टक्के यकृत प्रत्यारोपण हे जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपण आहेत. यकृत प्रत्यारोपणातून दाताला बरे होण्यासाठी लागणारा वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. साधारणपणे, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणि कामावर परतण्यासाठी सुमारे चार ते सहा आठवडे लागतात. व्यक्तीनुसार हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. यकृत प्रत्यारोपणाचा एक फायदा म्हणजे दात्याचे स्वतःचे यकृत कालांतराने पुन्हा निर्माण होईल असे डॉ राऊत यांनी सांगितले.
मला शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराचे निदान झाले. डॉक्टरांनी माझ्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम सांगितल्यानंतर मी घाबरुन गेलो होतो. मृत्यूच्या विचाराने मला रात्रंदिवस सतावले. माझ्या यकृत रोगाचा टप्पा आणि वैद्यकिय इतिहास लक्षात घेऊन रुग्णालयाने माझ्या विशिष्ट गरजांनुसार एक उपचार धोरण आखले. यकृत दान करणाऱ्या माझ्या पुतण्याचेही मी आभार मानतो. रुग्णालयातील डॉक्टरांच्या टिमच्या प्रयत्नामुळे आज माझा जीव वाचला, असे रुग्ण अनिल पोरजी यांनी सांगितले.