१५ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने दिल्लीत गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून या विश्वचषकात एक ‘अपसेट’ केला. तसेच काय नेदरलँड्स अफगाणिस्तानकडून प्रेरणा घेऊन या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना न गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेला मात देऊ शकेल?
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १५ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात १७ ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.
दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांनी १९९६ पासून एकमेकांविरुद्ध सात एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी दक्षिण आफ्रिकेने सहा जिंकले आहेत तर एक सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात, ते एकमेकांविरुद्ध फक्त एक एक दिवसीय सामना खेळले आहेत, जो दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. विश्वचषक स्पर्धेत, दक्षिण आफ्रिकेने १९९६ ते २०११ दरम्यान नेदरलँड्सविरुद्धचे तीनही सामने जिंकून आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिका | नेदरलँड्स | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ३ | १४ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) | ६ | ० |
भारतात एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | १ | ० |
विश्वचषकात (विजय) | ३ | ० |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सची आतापर्यंतची कामगिरी
दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला तिसरा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांनी त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विरोधाभासी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने त्यांचे पहिले दोन सामने जिंकले आहेत, तर नेदरलँड्सने त्यांचे पहिले दोन सामने हरले आहेत. दक्षिण आफ्रिकेने दिल्ली येथे श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला आणि त्यानंतर लखनौ येथे ऑस्ट्रेलियावर १३४ धावांनी मात केली. दुसरीकडे नेदरलँडला हैदराबादमध्ये पाकिस्तानकडून ८१ धावांनी आणि न्यूझीलंडकडून ९९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.
नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास दे लीड, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाईन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकर, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
दुखापती अपडेट्स
दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सला त्यांच्या आगामी सामन्यात दुखापतीची चिंता नाही.
खेळण्याची परिस्थिती
धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. दोन्ही संघ या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहेत. हे ठिकाण या स्पर्धेतील तिसरा सामना आयोजित करणार आहे. पहिली आणि दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या मागील सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आउटफिल्ड खराब असल्याचे मत व्यक्त केले. क्षेत्ररक्षण करताना दुखापती टाळण्यासाठी क्षेत्ररक्षकांना अधिक काळजी घ्यावी लागेल. अन्यथा, परिस्थिती क्रिकेटच्या एका रोमांचक सामन्यासाठी अनुकूल आहे.
हवामान
हवामान मुख्यतः ढगाळ आणि दुपारी वादळी वाऱ्यासह थंड राहण्याचा अंदाज आहे. दिवसभरात कमाल तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन ८२ % असेल. ५५ % पावसाची संभाव्यता आणि ३३% वादळाची शक्यता आहे. वारा पूर्वेकडून वाहेल.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
दक्षिण आफ्रिकेसाठी त्यांचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाठोपाठ शतके ठोकली आहेत. १०५ च्या सरासरीने आणि ११० च्या स्ट्राईक रेटने २०९ धावा करून तो त्याच्या संघासाठी सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे. गोलंदाजांमध्ये, उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज कागिसो रबाडा त्याच्या मागील दोन सामन्यात पाच विकेट्स घेऊन आपल्या संघासाठी सर्वात यशस्वी ठरला आहे. तो नवीन चेंडूनी उत्कृष्ट गोलंदाजी करतो आणि त्याच्या शस्त्रागारात चांगली विविधता आहे.
नेदरलँडसाठी, अष्टपैलू बास दे लीडेने बॅट आणि चेंडूने उपयुक्त योगदान केले आहे. या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने गेल्या दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्स पटकावल्या आहेत आणि तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. फलंदाजीत त्याने एका अर्धशतकासह ८५ धावा केल्या आहेत. याशिवाय कॉलिन अकरमनने अष्टपैलू योगदान दिले आहे. त्याच्या नावावर दोन विकेट्स आणि ८६ धावा आहेत.

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १७ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)