निवडणूक विभागाला लागेना अडीच लाख मतदारांचा शोध!

Thanevaibhav Online

14 September 2023

ठाणे लोकसभा मतदार संघातील घोळ संपवण्याची मागणी

ठाणे: ठाणे लोकसभा मतदार संघातील अडीच लाखाहून अधिक मतदारांची ओळख पटलेली नाही. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने केलेल्या मतदार याद्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातील ओळख न पटलेल्या किंवा वास्तव्य पत्त्यावर न सापडलेल्या दोन लाख ६४,८६० मतदारांची यादी प्रसिध्द करून ती विद्यमान आमदार आणि खासदार यांना सुपूर्द केली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात ओवळे-माजिवडे, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मीरा-भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदार संघातील मतदार याद्यांच्या पूनर्रिक्षणाचे काम निवडणूक विभागाकडून होत असताना अनेक मतदार हे राहत्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. किंवा ते अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याची माहिती मिळाली. या मतदारांबाबत योग्य निर्णय घेऊन अद्ययावत याद्या तयार कराव्यात अशी मागणी सर्वपक्षियांनी केली आहे.

खा.राजन विचारे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. हा मतदार यादीतील घोळ अत्यंत संशयास्पद आहे. ही नावे मतदार यादीमध्ये ठेवण्यासाठी काही राजकीय शक्ती सक्रिय असल्याचा संशय या पत्रामध्ये व्यक्त केला आहे. ओळख न पटणारे जेवढे मतदार आहेत त्यांची शहानिशा अत्यंत पारदर्शक पद्धतीने करून दुबार तपासणी करावी, तसेच ही नावे ठेवायची कि वगळायची याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही हे शोधणे सोपे व्हावे याकरिता आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा. निवडणुकीसाठी आवश्यक असणारा फॉर्म आयडी बीएलए हा फॉर्म इंग्रजीत न ठेवता तो मराठीमध्येच करावा, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणेच निर्णय घ्यावा असे आदेश दिल्याचे कळते.

ठाणे लोकसभा मतदारसंघाची विधानसभानिहाय आकडेवारी

विधानसभा क्षेत्र

ओळख न पटणारे मतदार

१४५ मीरा-भाईंदर विधानसभा

१५९३५

१४६ ओवळा-माजिवडा विधानसभा

१०४०००

१४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा

१३३५०

१४८ ठाणे शहर विधानसभा

१२४९६५

१५० ऐरोली विधानसभा

४६३६

१५१ बेलापूर विधानसभा

१९७४

ओळख न पटणारे एकूण मतदार

२६४८६० /-