Thanevaibhav Online
14 September 2023
आ.संजय केळकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी
ठाणे: ठाण्यातील वडारवाडी येथील एसआरए प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडल्याने येथील शेकडो रहिवासी हक्काच्या घरापासून वंचित आहेत. आज आमदार संजय केळकर यांनी एसआरए विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून विकासकाला सक्त सूचना दिल्या. त्यामुळे या प्रकल्पाला गती येऊन घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वडारवाडी येथील शेकडो कुटुंबे सध्या एसआरए प्रकल्पामुळे भाडे कराराने अन्यत्र राहत आहेत. प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्याने रहिवासी हक्काच्या घरांच्या प्रतिक्षेत आहेत. येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून श्री.केळकर याकामी पाठपुरावा करत आहेत.
येत्या डिसेंबरला रहिवाशांना घराच्या चाव्या देण्याचे विकासकाने मान्य केले होते, मात्र या मुहूर्तावरही घरे मिळणे अशक्य असल्याचे दिसत होते. अखेर आमदार केळकर यांनी एसआरए विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
यावेळी विकासकाला सक्त सूचना देण्यात आल्यानंतर मनुष्यबळ वाढवून कामाचा वेग वाढवणार असल्याचे त्याने मान्य केले. तसेच मार्चमध्ये सर्व रहिवाशांना ओसीसह घराच्या चाव्या देण्याचे विकासकाने मान्य केल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.