बाजारात मेथीची जुडी खाऊ लागली भाव

Thanevaibhav Online

14 September 2023

किरकोळीत एक जुडी पन्नाशीवर

नवी मुंबई : हवामानातील ऊन-पाऊस अशा बदलाचा मेथीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे एपीएमसीत मेथीची आवक घटली असून दरात वाढ झाली आहे. परिणामी किरकोळ बाजारात गृहिणींना मेथीच्या एका जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत आहेत.

श्रावण महिन्यात भाज्यांची मागणी अधिक असून जेवणात पालेभाज्यांचा समावेश अधिक असतो. मात्र वातावरणातील बदलामुळे मेथीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात अवघी ५० टक्केच आवक होत आहे. एपीएमसी बाजारात पुणे आणि नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या दाखल होत असतात. मात्र सध्या बाजारात लातूर, उस्मानाबाद आणि कर्नाटक येथून देखील पालेभाज्या दाखल होत आहेत. पुणे आणि नाशिक येथील मेथी अगदी कमी प्रमाणात आहे.

बुधवारी एपीएमसीत मेथीच्या नऊ गाड्या दाखल झाल्या असून दोन लाख ९० हजार क्विंटल आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात आवक कमी असल्याने घाऊकमध्ये दरात वाढ झाली असून प्रतिजुडी १८ ते २५ रुपयांनी विक्री होत आहे. त्याचवेळी किरकोळ बाजारात मेथी ४० ते ५० रुपये अशा दुप्पट दराने विक्री होत आहे.

हवामान बदलाने मेथीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारात मेथीची अवघी ५०टक्के आवक होत आहे. परिणामी मेथीच्या घाऊक दरात वाढ झाली असून प्रतिजुडी २०-२५रुपयांनी विक्री होत असल्याची माहिती व्यापारी भारत घुले यांनी दिली.

आजच्या स्थितीत शाकाहार करणे महाग झाले आहे. आधी टॉमेटोने कंबरडे मोडले होते. त्याचे दर खाली उतरत नाही तोवर मेथीचे दर देखील ५० रुपयांवर गेल्याने भाज्या शिजवायच्या तरी कशा? असा प्रश्न गृहिणी जयश्री चौधरी यांनी उपस्थित केला आहे.