ठामपा शाळांची मदार तासिका शिक्षकांवर
ठाणे: विद्यार्थी अध्यापनाची सेवा न बजावता ठाणे पालिका शाळेतील ३२ शिक्षक शालेय व्यवस्थापनाच्या अशैक्षणिक कामात गुंतल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांच्या जागी तासिका शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत.
अशैक्षणिक कामाला जुंपलेले शिक्षक ज्येष्ठ असून त्यांचा अनुभव दांडगा आहे. पण त्यांच्या या अनुभवाचा उपयोग विद्यार्थ्यांना होत नसून परिणामी शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ठाणे महापालिका शिक्षण विभागात सुमारे ७०० शिक्षक आहेत. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने पालिकेने मानधन तत्वावर २०० तासिका शिक्षक घेतले आहेत. दहा ते पंधरा हजार मानधनावर हे शिक्षक सध्या पालिका शाळेत अद्यापनाचे कार्य बजावत आहेत. पण सुमारे दीड लाख पगार घेणारे ३२ शिक्षक पालिका मुख्यालयात किंवा केंद्र शाळेत बसून व्यवस्थापनाची कारकुनी करत असल्याचे समोर आले आहे. वास्तविक पालिकेच्या शिक्षण विभागात दोन युआरसी समन्वयक, २४ सीआरसी आणि आठ गटप्रमुख आहेत. त्यापैकी दोन गटप्रमुख हे मुख्याध्यापक असून ते शासन अध्यादेशानुसार सीआरसी पदावर राहू शकतात. पण ते दोन मुख्याध्यापक वगळता शिक्षण विभागात ३२ शिक्षक अशैक्षणिक काम करत असताना दिसून आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ३ मे २०१३ च्या अध्यादेशानुसार निवडणुका वगळता शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक काम न देण्याच्या सुचना आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार शिक्षणाधिकार्यांनी या अध्यादेशाला केराची टोपली दाखवत शिक्षकांची केंद्र शाळेत समन्वयक, गटप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. हे शिक्षक शाळांना भेटी देणे, अॅडमिशनची कामे करणे यासह इतर कामे करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेपासून वंचित राहिले आहेत. शिक्षण विभागात शिक्षकांची संख्या कमी असल्याने तासिका तत्वावर सुमारे २०० शिक्षकांची नियुक्ती जुलै २०२३ पासून करण्यात आली आहे. त्याचा आर्थिक भार नाहक महापालिकेला सहन करावा लागत आहे.
एका शिक्षकाचा पगार १ लाख ४० हजारच्या आसपास आहे. त्यानुसार ३२ शिक्षकांना महिन्याला ४४ लाख ८० हजार रुपयांचे वेत अदा केले जाते. हे वेतन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिले जाते. पण वर्षानुवर्षे अशैक्षणिक काम करूनही या शिक्षकांना अध्यापनाचे वेतन अदा केले जात असल्याने इतर शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी श्री.राक्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने मतदार सर्वेक्षणासाठी काही शिक्षकांना जबाबदारी दिली आहे, पण ते शाळेच्या वेळेव्यतिरिक्त काम करत आहेत. तर शिक्षण विभागातील शिक्षकांना अशैक्षणिक कामास जुंपलेले नसल्याची माहिती श्री.राक्षे यांनी दिली.