चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारताचा अवघ्या विश्वात बोलबाला झाला आहे. गेल्या काही वर्षात देशाच्या प्रतिमेत सातत्याने होणारी वृद्धी भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन अमुलाग्र बदल घडवत आहे. त्याचे श्रेय राजकीयदृष्ट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असले तरी राजकारणाचा चष्मा बाजूला ठेवून पाहणारेही या नवीन प्रतिमेचा स्वीकार करीत आहेत. भले त्याचे श्रेय ते मोदींना देवोत अथवा नाही. या मोहिमेत शिकण्यासारखे खूप काही हाती लागले आहे. ज्याने-त्याने आपल्या आवडीप्रमाणे किंवा कुवतीप्रमाणे या ऐतिहासिक क्षणामागील परिश्रम, जिद्द, बुद्धिमत्ता, निरलसपणा, सचोटी असे गुण वेचून आपापली यशश्रीची माळ बनवावी.
चंद्रावर यात उतरणे आणि पुढे त्याला दिलेली कामगिरी त्याने चोख बजावून हे निर्धारित कर्तव्य तंत्रज्ञानाच्या अत्यंत गुंतागुंत असलेल्या प्रक्रियेतील सुलभता शोधून त्यातून अपेक्षित परिणाम मिळवेल. त्यासाठी इस्रोचे प्रमुख म्हणाले ते समर्पक होते. हा परिणाम एका संपूर्ण पिढीच्या योगदानाचा परिपाक होता. चंद्रयान एक आणि दोन या मोहिमेतील तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. ज्याला भारतातील मूल्य व्यवस्थेबद्दल आदर आहे आणि त्याचे आचरण करावेसे वाटते त्यांना श्री. सोमनाथ यांचे उदात्त विचार प्रेरणादायी ठरू शकतात. स्पर्धेच्या युगात श्रेय घेण्यावरून नेहमीच सुंदोपसुंदी बघायला मिळत असते आणि श्रेयाच्या खऱ्या मानकऱ्याला त्यापासून वंचित ठेवण्यासाठी कटकारस्थाने आखली जात असतात. वृद्धिजीवी आणि उच्चशिक्षित माणसे कार्पोरेट बोर्डरूममध्ये राजकारण खेळत असतात, अशावेळी सोमनाथ यांचे विधान सुखद धक्का देऊन जाते. चांद्रयानासारखे अभूतपूर्व यश आपल्याच नावावर नोंद व्हावे असे कोणालाही वाटू शकते. परंतु इस्रोची कार्यसंस्कृती त्यास अपवाद ठरली. चांद्रयान मोहीम हा सांघिक प्रयत्नाचा सर्वोत्तम अविष्कार आहे. कनिष्ठ कर्मचारी आणि शास्त्रज्ञ ते मधल्या पातळीवर अभियंते आणि सर्वात वरच्या पातळीवर निर्णय घेणारे मोठे अधिकारी हे सारे एका ध्येयाने प्रेरित होऊन सामूहिक यशासाठी कसे समर्पित होऊन काम करू शकतात हे चांद्रयान तीन चे प्रक्षेपण पाहताना अनेकांनी अनुभवले. सोमनाथ यांच्या उदात्त विचारसरणीची बीजे या सांघिक प्रयत्नात दडली आहेत यावर आपला विश्वास बसतो. चंद्रयान मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे आणि आधीची फसलेली मोहीम जिव्हारी लागली असतांना त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता पेटवलेला संकल्प सिद्धी यज्ञ यशस्वी व्हावा म्हणून सर्वतोपरी काळजी घेणाऱ्यांना स्वार्थाची भावना शिवेलच कशी? हा दिलासादायक धडा अनेकांना त्यातून घेता येऊ शकेल.
इस्रोच्या कार्यपद्धतीचा आणखी एक भाग जो खरे तर समस्त सरकारी यंत्रणेला अमलात आणता येऊ शकेल आणि तो म्हणजे वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या कामाचा आढावा घेण्याची पद्धत. कामाचे अवलोकन करताना त्यावर सविस्तर चर्चा, चुकांचा परामर्श घेणे आणि त्या शोधणारा व उपाय सुचवणारा आपल्यापेक्षा कनिष्ठ असला तरी त्याच्या मताचा आदर करणे हा इस्रोच्या कार्यपद्धतीचा मोठा भाग आहे. ही मोकळीक कामाचा दर्जा आणि सांघिक भावनेतील एकोपा वाढवण्यास उपयोगी पडते. ही पद्धत स्थानिक प्रशासकीय यंत्रणेपासून राज्य आणि केंद्र सरकारने लागू करतील तर चित्र वेगळे दिसेल. नाही म्हणायला असे नैमित्तिक अहवाल आणि बैठका होत असतात. परंतु त्या औपचारिक पातळीपर्यंत मर्यादित असतात. अशा सरकारी बैठकीत सादर होणाऱ्या आकडेवारीत हाच मुख्य आधार असतो. त्या अनेकदा खोट्या आणि हेराफेरीने सादर केलेल्या असतात. त्यामुळे कामात सुधारणा ते काम वेळेत पूर्ण होते की नाही आणि त्याचा दर्जा राखला जातो की नाही हे मुद्दे गौण ठरतात. असे अधिकारी चंद्रयानसारख्या मोहिमेसाठी नेमले गेले असते तर खचितच ही मोहीम फत्ते झाली नसती. हा आरोप करताना आमचा रोख कोणा व्यक्तीवर नसून आपल्या यंत्रणेतील पोकळपणा दाखवण्याचा आहे.
आपण साधे आपल्या शहराच्या पालिकेचे उदाहरण घेऊया. घरपट्टी वसुलीचे खाते कर जमा करण्याचे काम करीत असते. त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने आखलेल्या योजनांची कल्पना नसते, तसे जाणून घेण्याची त्यांच्याकडून अपेक्षाही नसते. परंतु जो पैसा नागरी कामांवर खर्च होतो तो करवसुली करणारी खाती मग ते मालमत्ता खाते असो की पाणी वा जाहिरात खाते, या सर्वांना त्यांनी जमा केलेला पैसा कसा खर्च होतो हे कळायलाच हवे. प्रसंगी करवसुली कमी असेल तर वाढवण्याचा ते प्रयत्न करू शकतात. तद्वत बांधकाम खाते करदात्यांच्या पैशाचा अपव्य कसा होणार नाही याचे भान ठेवू शकतात परंतु हे केव्हा शक्य आहे जेव्हा ही खाती एकमेकांच्या कामात रस घेतील तेव्हा! आपल्याकडे असा व्यापक विचार म्हणजे एकमेकांच्या कामात विनाकारण नाक खुपसणे आणि ढवळाढवळ करणे या शीर्षकाखाली गणले जाते.
स्थानिक संस्था असो व राज्य आणि केंद्र सरकार यांनी जमा खर्चाच्या आघाडीवर इस्रोचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले तर लोककल्याणाचे यान सुखरूप जनतेच्या अपेक्षांच्या भूमीवर उतरेल. हा या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा अनुकरणीय मुद्दा आहे