७५ कोटींचा निधी मंजूर
ठाणे : राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी तब्बल ६०५ कोटींचा निधी दिल्यानंतर आता ठाण्यातील उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी आणि विकासकामांसाठी ७५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शहरातील मरगळ आलेल्या उद्यानांना नवी झळाळी येणार आहे.
तलावांचे ठाणे अशी ओळख मिळालेल्या ठाणे शहराला मागील काही काळात उद्यानांचे ठाणे अशी ओळखही मिळू लागली आहे. मात्र त्याकडे होणारे दुर्लक्ष आणि ठोस धोरणांचा अभाव यामुळे उद्यानांची रया जाऊ लागली आहे. मैदानांची कमतरता असल्याने ठाणेकरांना उद्यानांचा मोठा आधार होता. मात्र दयनीय अवस्था प्राप्त होत असताना नागरिकांना मनोरंजन आणि आरोग्याच्या आघाडीवर निराश व्हावे लागत होते. मात्र लवकरच ठाणेकरांना विकसित आणि सुशोभित उद्यानांची भेट मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या उद्यानांना नवी झळाळी देण्यासाठी ७५ कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. रस्ते, सुशोभीकरण या पाठोपाठ आता उद्यानांनाही निधी मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे महापालिकेवर राज्य सरकारकडून निधीचा वर्षाव सुरूच असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेने एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव तयार केला होता. या कामांसाठी ६० कोटींचा निधी देण्याची मागणी पालिकेने राज्य शासनाकडे केली होती.
दरम्यान उद्यान विभागाच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी असून खुद्द आयुक्त अभिजीत बांगर हे सुद्धा त्याबाबत समाधानी नाहीत. त्यामुळे या उद्यानांच्या विकास कामांबाबत जागरूक ठाणेकर आतापासूनच प्रश्न उभे करत आहेत. असे असले तरी ही कामे दर्जेदार व्हावीत, नियोजन उत्तम व्हावे यासाठी स्वतः आयुक्त स्वारस्य दाखवत असून प्रत्यक्ष कामात लक्ष घालणार असल्याचे कळते.