ठाणे: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार दिवा रेल्वे स्थानक पूर्वेला तयार झालेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याचे काल नुकतेच लोकार्पण झाल्याने प्रवाशांनी देखील ब्रिजवरून जाण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे प्रथमच रेल्वे फाटक क्रॉसिंगमुक्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी काल लोकार्पण सोहळ्याच्या वेळी दिवा स्थानकाला दिलेल्या भेटीत फलाट क्रमांक १ व २ वरील मुंबई दिशेकडील शेवटच्या टोकाला फलाटावर चढण्या-उतरण्यासाठी असलेले रॅम काढून त्या ठिकाणी रेलिंग बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार त्याठिकाणी रेलिंग बसवण्यात आली असून आज दिवा रेल्वे फाटक संपूर्णतः रेल्वे प्रवासी क्रॉसिंगमुक्त दिसला.
दिवा रेल्वे स्थानकात वाढणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता दिवा रेल्वे फाटकावरील प्रवासी क्रॉसिंग ही कायमची बंद व्हावी अशी मागणी आम्ही गेले अनेक वर्ष रेल्वे प्रशासनाकडे करत होतो. अनेक सूचना रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दिल्या होत्या. आज रेल्वे फाटकातून प्रवासी क्रॉसिंग पूर्णपणे बंद झाल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक दिवेकरांचे प्राण वाचणार आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून 50 पेक्षा जास्त दिवेकरांना येथे अपघाताला सामोरे जाऊन आपला जीव गमावा लागला होता. रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय हा उत्तम असल्याचे सांगून दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड.आदेश भगत यांनी आभार मानले आहेत.
दिवा पश्चिमेतील सरकता जिना आठवडाभरात सुरू होणार
दिवा पश्चिम येथील तयार होत असलेला सरकता जिना हा देखील लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. हा सरकता जिना येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला करणार असल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड.आदेश भगत यांनी सांगितले. फलाट क्रमांक १ आणि २ वरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई दिशेकडे देखील एक स्वयंचलित सरकता जिना व्हावा अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून केली जात होती. खा. शिंदे यांच्या प्रयत्नाने फलाट क्रमांक १ व २ वरील सरकता जिनासुद्धा मंजूर झाला असून त्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी आज मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवा स्थानकाची पाहणी केली.