तरुणाच्या प्राणघातक हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

हल्ल्यानंतर आरोपी तरुणाने देखील फिनायल प्यायले, कल्याण पूर्वेतील घटना

कल्याण : एका तरुणाने बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात घडली आहे. या तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने सात ते आठ वार केले. या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान आसपासच्या नागरिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

आदित्य कांबळे असे या तरुणाचे नाव असून हल्ल्यानंतर या तरुणाने देखील फिनायल प्राशन केले. आरोपीला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र हा तरुण काही दिवसांपासून या मुलीचा पाठलाग करत असल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व परिसरात भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.

दोन विविध ठिकाणी काही तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. गेल्या दहा दिवसात या घटना घडल्याने कल्याण पूर्व परिसरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये पोलिसांचा धाक राहिला की नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.