ठाणे : सिव्हील रुग्णालयाच्या जागेवर नव्या ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’चे बांधकाम जोरात सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयात दाखल झालेल्या शेवटच्या रुग्णावर यशस्वी उपचार केले. त्यानंतर मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेत स्थलांतरित केलेल्या सिव्हील रुग्णालयाचा ‘श्रीगणेशा’ झाला.
टेंभी नाका येथील ‘सिव्हील’चे बांधकाम पाडून ‘सुपर डुपर’ रुग्णालय बांधले जात आहे. तत्पूर्वी सुमारे तीन महिन्याआधी ओपीडी कार्यान्वित झाली होती. अतिदक्षता विभाग, रक्तपेढी अपघात, महिला बाल, प्रसूतीकक्ष, नेत्र, आयुष आदी या विभागांमध्ये रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी जिल्हा आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. वागळे इस्टेट मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेत सिव्हील तात्पुरते स्थलांतरित झाले आहे. रुग्णालयाचे सर्व विभाग सुरू झाल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दिवसाला सुमारे ३०० रुग्ण उपचारांकरीता येत आहेत,असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
स्थलांतरीत झालेल्या रुग्णालयात अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, अपघात, महिला बाल, प्रसूतीकक्ष, अद्ययावत तयार करण्यात आला आहे. शवविच्छेदन, अस्थिव्यंग, किचन, प्रयोगशाळा, एनआरसी, आयुष, आयुष, व्यवसायोपचार , सोनोग्राफी आणि क्ष किरण तपासणी, नेत्रबाह्य रुग्ण, दिव्यांग प्रमाणपत्र, डायलिसिस पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.
ओपीडी विभागात एकाच ठिकाणी वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा देतील अशा पद्धतीने कक्षाची बांधणी केली आहे. त्याबरोबर अतिदक्षता विभाग पूर्ण क्षमतेने सुरू आहे. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था स्वतंत्र जागेत व्यवस्था करण्यात येत आहेत, असे डॉ. पवार म्हणाले.