भाईंदर : नवघर पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाला १० लाख ४० हजाराचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन आला असता जप्त करून मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत मीरारोड भाईंदर परिसरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या इसमाविरुध्द माहिती प्राप्त करून कारवाई करण्याच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने मध्यवती गुन्हे शाखेतील प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक हे पथकासह मीरा-भाईंदर परिसरात गस्त घालत असताना गावदेवी चाळीसमोर, गावदेवी मंदीर रोड, नवघर गाव, भाईंदर पूर्व या ठिकाणी आले. रस्तावर एक इसम संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे त्यांना दिसले. त्याच्या हालचालीवर संशय आल्याने सापळा रचून पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने अंकित भरत जाधव (२१) असे सांगितले. या तरुणाजवळ ५२ ग्रॅम वजनाचा १० लाख ४० रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एमडी) हा अंमल पदार्थ विक्रीसाठी बाळगला असल्याची आढळून आले. अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.