ठाण्यातील.महाविद्यालयातील घटना
ठाणे: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडीओमध्ये एनसीसी युनिट हेड विद्यार्थ्याकडून कनिष्ठ विद्यार्थ्यांना प्लास्टिक रॉडने बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. या चित्रणामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे पश्चिमेकडील, चेंदणी कोळीवाडा येथील सिडको बस थांब्यानजीक के.जी.जोशी बेडेकर कॉलेज असून येथे के.जी.जोशी-बेडेकर कला शाखा, बांदोडकर विज्ञान शाखा, टीएमसी लॉ कॉलेज आणि डॉ. बेडेकर पॉलिटेक्निक हे विभाग आहेत. येथील विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीचे प्रशिक्षणपूर्व धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षा करण्यात येत असते. मात्र, व्हायरल व्हीडीओमध्ये युनिट हेड विद्यार्थ्याना करीत असलेली ही शिक्षा अक्षरशः अमानवी प्रकारची असल्याचे दिसत आहे.
महाविद्यालयाच्या प्रांगणात पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात विद्यार्थी कसरत करीत असताना हा युनिट हेड त्या विद्यार्थ्याना बेदम मारहाण करीत आहे. यामुळे विद्यार्थ्यामध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसी नको रे बाबा असे म्हणत आहेत. यासंदर्भात, महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, असे आवाहन केले आहे. हे असले प्रकार आम्ही कधीही खपवून घेणार नाही. जोशी बेडेकर महाविद्यालयात गेली ४० वर्षे एनसीसीमार्फत विविध जनहिताचे उपक्रम राबवले जातात. मात्र, हा प्रकार घृणास्पद, विकृत असा असून एनसीसीचे जे युनिट हेड असतात ते सिनियर विद्यार्थीच असतात, ते कोणी शिक्षक नसतात. मात्र हा प्रकार चुकीचाच असून याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. यामुळे एनसीसीमार्फत जी चांगली कामे होतात ती झाकोळली गेली आहेत. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एका कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करीत असून ज्या कुणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी न घाबरता आम्हाला येऊन भेटावे, तसेच एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये, असेही प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितले.