ठाणेकरांची कचराकोंडी सुटणार; डायघर प्रकल्प सप्टेंबरपासून सुरु

भंडार्ली प्रकल्प ३१ ऑगस्टपासून कायमचा बंद

ठाणे: भंडार्ली येथील कचरा प्रकल्प टप्याटप्याने ३१ ऑगस्टपर्यंत कायमचा बंद होणार असून डायघर कचरा प्रकल्प टप्याटप्याने येत्या १ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. महापालिकेला अखेर डायघरच्या रूपाने हक्काचे डंपिंग ग्राउंड मिळाल्याने ठाणेकरांची समस्या दूर झाली आहे.

ठाणे महापालिकेला हक्काचे डम्पींग नसल्याने मागील काही वर्षे महापालिका दिवा येथे कचरा डम्प करीत होती. परंतु त्याला विरोध झाल्याने अखेर दीड वर्षापूर्वी येथील डम्पींग कायमचे बंद करण्यात आले. त्यानंतर डायघरचा प्रकल्प सुरु करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. परंतु त्याठिकाणी देखील स्थानिकांचा विरोध दिसून आला. दिव्यातील विरोध लक्षात घेऊन महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात भंडार्ली येथे कचरा टाकण्यास सुरवात केली होती. हा प्रकल्प केवळ एक वर्षासाठी होता. परंतु वर्षभरानंतरही हा प्रकल्प सुरु राहिल्याने आणि पावसाळ्यात त्याचा त्रास येथील रहिवाशांना झाल्याने अखेर स्थानिकांनी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात महापालिकेत धडक दिली होती. त्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत तेथील प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन दिले होते. या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी देखील तेच आश्वासन येथील स्थानिकांना दिले होते.

दरम्यान १५ सप्टेंबर नव्हे तर ३१ ऑगस्टपासून भंडार्ली येथे कचरा टाकण्याचा शेवटचा दिवस असणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. त्यानंतर येथील कचरा महापालिकेच्या हक्काच्या डम्पींगमध्ये टाकला जाणार आहे. ठाणे महापालिकेचे डायघर येथे कचरा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुमारे १४ वर्षानंतर प्रत्यक्षात उतरत आहे. त्यानुसार येत्या १ सप्टेंबरपासून याच ठिकाणी संपूर्ण क्षमतेने येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरु केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सध्या १ सप्टेंबरपासून पहिल्या टप्प्यात डायघर येथे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वीजनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.