भाईंदर: मीरा-भाईंदरकरांनी शहरातील स्व. लता मंगेशकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या पहिल्या मराठी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून नाट्यगृहाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचा आरोप निखालस खोटा ठरविला आहे.
नाट्यगृह बनल्यापासून आतापर्यंत एकही मराठी नाटक झाले नसल्यामुळे मराठी प्रेक्षकांचा सदर नाट्यगृहात वावर दिसत नव्हता. अनेक दिवसांपासून मराठी नाटकाचा प्रयोग लावण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार येत्या रविवारी ‘करून गेलो गाव’ या मराठी नाटकाचे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच नाटकाची तिकीट विक्री पूर्ण झाल्यामुळे नाट्यप्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे.
शहरात नाट्यगृह नसल्यामुळे शहरातील नाट्यरसिकांना मुंबई किंवा ठाण्याला जावे लागत होते. त्यामुळे पालिकेने काशिमीरा येथील मौजे महाजनवाडी येथे स्व. लता मंगेशकर या नावाने नाट्यगृह उभारले आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आले. त्यानंतर नाट्यगृहात एका नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. परंतु नाट्यगृहात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे हा प्रयोग रद्द करण्यात आला.
पालिकेने नाट्यगृहातील तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. त्यानंतर या नाट्यगृहात खासगी कार्यक्रम तसेच अनेक हिंदी व गुजराती नाटकांचे प्रयोग आयोजित केले जात होते. परंतु मराठी नाट्यनिर्मात्यांनी पाठ फिरवल्यामुळे नाट्यगृहाच्या उद्घाटनापासून नाट्यगृहात एकही मराठी नाटक झाले नव्हते. अखेर ६ ऑगस्ट रोजी ‘करून गेलो गाव’ हे नाटक या नाट्यगृहात होणार आहे. अल्पावधीतच सदर प्रयोग हाऊसफुल्ल झाला असल्यामुळे सदर नाट्यगृहाला मराठी प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.