खासगी संस्थेला दिलेली समाज मंदिराची बांधकाम परवानगी रद्द

वर्तकनगर समाज मंदीर संघर्ष समितीच्या लढ्याला यश

ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून वर्तकनगर समाज मंदिर सभागृहाच्या भूखंडावरून सुरू असलेल्या लढ्याला अखेर संघर्ष समितीला यश आले आहे. विहंग महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेला दिलेली निविदा रद्द करण्यात आली असून म्हाडाने सकारात्मक विचार केला असल्याचे समाज मंदीर संघर्ष समिती तर्फे मनसेचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

वर्तकनगरवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या वर्तकनगर समाजमंदिर सभागृहाचा’ भूखंड लाटण्याचा प्रयत्न खासगी संस्थेने आखल्याचा आरोप करत वर्तकनगरवासींनी आवाज उठविला. यास वर्तकनगर समाजमंदिर संघर्ष समिती’च्या मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या सर्वपक्षीय सदस्य आणि स्थानिकांनी विरोध केला.

याप्रश्नी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. तर आमदार संजय केळकर यांनीही विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. अखेर संघर्ष समितीच्या एकत्रित लढ्याला यश आले असून विहंग महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेला २०२० साली दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान आमदार संजय केळकर यांनी म्हाडा मुख्याधिकारी आणि समाज मंदीर संघर्ष समिती अशी संयुक्त भेट घडविली होती. या जागेवर निवासी आणि वाणिज्य इमारत न उभारता फक्त समाज मंदीर सभागृह , वाहन तळ, क्लब हाऊस व्हावे, अशी मागणी केली होती. या लढ्याला आलेल्या यशाबद्दल समितीने सोमवारी भेट घेत आभार व्यक्त केले. समाज मंदीर संघर्ष समितीतर्फे संदीप पाचंगे, प्रशांत सातपुते, मिलिंद डिचवलकर, अमोल राणे, कमलाकर दळवी, रवी सोनवणे, राजेंद्र शिंदे, सचिन सकपाळ, नितीन कदम, समीर शिरसेकर, सुरेंद्र जाधव, सुनिल सकपाळ तसेच वर्तक नगरमधील रहिवाशी उपस्थित होते.

ठाण्यातील समाजमंदिर भूखंड ९० वर्षांच्या जमीन भाडेपट्टा करारावर दर ३० वर्षांनी भाडेपट्टा नूतनीकरण करार आणि वार्षिक १० कार्यक्रम मोफत देण्याच्या अटीवर ई-लिलाव काढला आहे. या ई-लिलाव प्रकियेत तीन संस्थानी भाग घेतला असून ११ ऑगस्ट रोजी लिलाव जाहीर होईल. त्यात सर्वात जास्त बोली देणाऱ्या संस्थेस समाजमंदिर भूखंड देण्यात येणार आहे.