भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी
पुणे: लोणावळ्यात वीकेंडनिमित्त आज पुन्हा पर्यटकांची गर्दी झाली आहे. सर्वांच्या आवडीचे ठिकाण असलेल्या भुशी धरणावर सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी झाल्याचं चित्र आहे.
काही पर्यटक जीवावर बेतणारे पर्यटन करत होते. भुशी धरणात काही पर्यटक जीव धोक्यात घालून पोहत होते. अस असलं तरी भुशी धरणावर लोणावळा शहर पोलीस दिसले नाहीत. पर्यटकांनी अशा प्रकारे जीवावर बेतणारे पर्यटन करू नये असे वारंवार आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. तरीही काही पर्यटक सर्व नियम झुगारून अशा प्रकारे पर्यटन करताना दिसत आहेत.
आज विकेंड असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. भुशी धरणासह लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. भुशी धरण, टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट धुक्यात हरवल्याचे चित्र होतं. या धुक्याचा आनंद घेण्यासाठी राज्यासह परराज्यातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लोणावळ्यात पावसाचं प्रमाण कमी झाल आहे. परंतु, पर्यटक मात्र त्याच जोमाने येत असून भुशी धरणाच्या पायऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामध्ये बसून वर्षाविहाराचा आनंद घेत आहेत. भुशी धरणाचा अवघा परिसर धुक्यात हरवला होता. डोळ्याला सुखद असं चित्र बघायला मिळालं. गरमागरम भजी, मक्याचं कणीस, वडापाव आणि वाफाळलेला चहा याचा आस्वाद घेण्याचा आनंद लोणावळ्यात काही वेगळाच आहे.