नागरिकांची सुमारे ३०० कोटींची फसवणूक
आमदार संजय केळकर यांचा विकासकाविरुद्ध एल्गार
ठाणे: तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात एका विकासकाने शेकडो नागरिकांकडून सुमारे ३०० कोटी घेऊन गेल्या १० वर्षांत एक विटही रचली नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. आमदार संजय केळकर यांनी दणका देताच विकासकाने ऑगस्टपासून बांधकाम सुरू करण्याचे वचन दिले आहे. तर घरे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
राजेश पटेल असे विकासकाचे नाव असून त्याच्या विरोधात तब्बल १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते. या विकासकाने २०१३ साली घोडबंदर मार्गावर तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात राज टॉवर उभारण्याची योजना पुढे आणून नागरिकांकडून गुंतवणूक करून घेतली. अनेकांनी निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तर काहींनी कर्ज काढुन आयुष्यभराची पुंजी घरासाठी गुंतवली. घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल या आशेने सुमारे ५०० जणांनी साधारण २५० ते ३०० कोटींची रक्कम या विकासकाला दिली. मात्र आजतागायत या विकासकाने इमारतीची एक विटही रचली नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
या नागरिकांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. श्री.केळकर यांनी जाब विचारताच विकासकाने १५ मे २०२१ रोजी काम सुरू करणार असल्याचा शब्द दिला. मात्र हा शब्दही फोल ठरल्याने शनिवारी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी रस्त्यावर उतरून विकासकाविरोधात टाहो फोडला. आंदोलनाचा धसका घेतलेल्या विकासकाने येत्या ४ ऑगस्टपासून बांधकामास सुरुवात करणार असल्याचा शब्द दिला. दरम्यान विकासकाची गय केली जाणार नसून जोपर्यंत ग्राहकांना हक्काचे घर मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही देत नागरिकांना आश्र्वस्त केले.
याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठाणे शहरात विकासकांकडून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढीस लागल्याचे सांगितले. शहरात लहान मोठ्या विकासकांकडून सुमारे पाच हजार ग्राहकांची फसवणूक झाली असून त्यांच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. त्यांना हक्काचे घर मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही श्री.केळकर यांनी दिला.