ठामपाची आर्थिक पत घसरली; बी प्लस दर्जामुळे कर्जांवर निर्बंध?

क्रिसिल संस्थेच्या अहवालाने खळबळ

ठाणे: ठाणे महापालिकेची आर्थिक पत घसरली असून A++असलेला दर्जा B+झाल्याचे क्रिसिल या संस्थेने त्यांच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केले आहे, त्यामुळे कर्ज किंवा कर्ज रोखे काढताना अन्य संस्थांची मदत घ्यावी लागणार आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती पाच ते सहा वर्षापूर्वी अतिशय चांगली होती. अनेक वित्तीय संस्था महापालिकेला कर्ज पुरवठा करण्यासाठी पायघड्या घालत होत्या. महापालिकेचे उत्पन्न सुमारे ४५०० कोटींच्या पुढे गेले होते. महापालिकेवर एमएमआरडीए व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वित्तीय संस्थाचे कर्ज नव्हते. त्यांच्या कर्जाचा हप्ता देखील वेळेवर भरला जात होता. महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ६०० कोटींच्या ठेवी होत्या. ठेकेदारांना वेळेवर त्यांची देयके अदा केली जात होती. तसेच भांडवली खर्च देखिल महापालिका मोठ्या प्रमाणावर करत होती, परंतु कोरोनाच्या काळात महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली गेली. महापालिकेच्या सहाशे कोटींच्या ठेवी मोडल्या गेल्या.

सध्या महापालिकेवर दोन हजार कोटींचे दायित्व आहे. त्यातच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याचा सुमारे दीडशे कोटींचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर पडला आहे. आस्थापना खर्च ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे तर दुसरीकडे उत्पन्न घटले आहे. मालमत्ता कराव्यतिरिक्त अन्य मार्गाने म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. शहर विकास विभागाचे उत्पन्न १०० ते २०० कोटींपेक्षा जास्त मिळत नाही तसेच पाणीपट्टी, अग्निशमन कर, जाहिरात कर अपेक्षित मिळत नाही, त्यामुळे महापालिकेची आर्थिक पत खालावली आहे.

याबाबत महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतचा अहवाल तयार करणाऱ्या क्रिसिल या संस्थेने महापालिकेबरोबर संवाद न साधता ही पत क्षमता जाहीर केली आहे. महापालिकेला कर्ज घ्यायचे असेल तर आर्थिक पत क्षमता जाहीर करणाऱ्या दुसऱ्या देखील संस्था आहेत. त्यांची महापालिका मदत घेऊ शकते असे देखिल ते अधिकारी म्हणाले.*